नसरापूर येथील वनश्री सोमनाथ उकिर्डे (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राजगड पोलिसांनी राहुल गजानन बाठे (रा. केतकावळे, ता. पुरंदर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उकिरडे यांचे कापूरहोळ येथे सासवड रस्त्यालगत दुकानाचे गाळे आहेत. त्यातील दोन गाळे भाडेकरू बाठे यांना प्रत्येकी वार्षिक ४० हजार रुपये भाडे करारावर सन २०१५ ते २०२० पर्यंत दिले होते. या भाड्याच्या पैशावरून व त्या दुकानात असलेले दोन फ्रिज भाडेकरूने परस्पर विकल्याच्या कारणावरून उकिरडे व बाठे यांचा वाद होता.
दरम्यान, ११ डिसेंबर २०२० रोजी बाठे यांनी नसरापूर लगतच्या माळेगाव (ता. भोर) येथे उकिरर्डे पती-पत्नीस बोलावून दुकान भाडे व विकलेल्या फ्रिजची चर्चा करताना दमदाटी केली. तद्नंतर उकिरडे पतिपत्नीस नसरापूरकडे येत असताना शिवगंगा नदीजवळ बाठे याने त्याची गाडी (एमएच १२ एफयू ००९९) उकिर्डे यांच्या मोटारीला (एमएच १२ एफयू ७६०४) आडवी लावली. त्यावेळी सोमनाथ यांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी वनश्री यांनी पती सोमनाथ यांना सोडवायचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ करत हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याची भाडेकरूविरुद्ध तक्रार उकिर्डे यांनी राजगड पोलीस ठाण्यात दिली आहे.