पुणे : तक्रारीची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी उद्धट वर्तन करुन पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना शिवीगाळ करुन मारहाण केली. महिला पोलीस निरीक्षकांची कॉलर पकडून त्यांना धमकावण्याचा प्रकार पोलीस ठाण्यातच घडला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मनोज महाले (वय ४२), दिपाली महाले (वय ४२, रा. शासकीय वसाहत,शास्त्रीनगर, येरवडा) अशी त्यांची नावे आहेत. हा प्रकार येरवडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडला. याबाबत पोलीस शिपाई सोमनाथ अशोक भोरडे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील गुरव यांच्या तक्रारीची पुर्तता करण्यासाठी मनोज महाले याला बोलविण्यासाठी फिर्यादी गेले असताना महाले याने त्यांच्याबरोबर उद्धट वर्तन केले. काही वेळाने ते येरवडा पोलीस ठाण्यात आले. तेथे निखील व त्याच्या वडिलांच्या अंगावर धावून जाऊ लागले. तेव्हा फिर्यादी हे समजावण्यासाठी गेले असताना त्यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली. यावेळी झटापटीमध्ये फिर्यादीच्या गणवेशाच्या शर्टचे बटण तोडून कायदेशीर कर्तव्य करण्यास अडथळा आणला. तसेच दिपाली महाले या पोलिसांना शिवीगाळ करीत असल्याने पोलीस निरीक्षक कांचन जाधव व महिला शिपाई शिरसाट हे तिला समजावण्यासाठी गेल्या असताना दिपाली महाले हिने जाधव यांची कॉलर पकडून तु मला जास्त शिकवायचे नाही, असे म्हणत शिरसाट यांना हाताने मारहाण केली. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत.