लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणी आणि तिच्या मित्रास मारहाण करून मोबाइल, रोख रक्कम हिसकावत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रवीेद्र रामू डोंगरे (वय ३०, रा. जनवाडी, जनता वसाहत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी या प्रकरणात कृष्णा मारुती डोंगरे (वय ३१, रा. श्री सृष्टी अपार्टमेंट, नऱ्हे, आंबेगाव) आणि किरण शरद डोंगरे (वय २७, रा. पीएमसी कॉलनी, कोथरूड) यांना अटक केली आहे. एका २४ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला आहे. १८ एप्रिल रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास मयूर कॉलनी कोथरूड येथे ही घटना घडली. तरुणीने कृष्णा डोंगरेला प्रेमास नकार दिला होता. तू आवडत नसल्याचे त्याला स्पष्टपणे सांगितले असतानाही कृष्णाने इतर साथीदारांच्या समवेत तरुणीचा चोरून पाठलाग केला आणि तरुणी व तिच्या मित्राला अडवले. त्याने शिवीगाळ करीत तिचा जबरदस्तीने हात पकडत तिच्यासह मित्राला मारहाण केली. तरुणीचा मोबाइल आणि रोख रक्कम हिसकावून घेत ते पळून गेले. दोन आरोपींना पोलिसांनी पूर्वीच अटक केली आहे. त्यांच्या आणखी एका साथीदाराला अटक करून न्यायालयात हजर केले असता, आरोपींनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. आरोपी कृष्णा डोंगरे याने गुन्हा एकतर्फी प्रेमातून केला आहे. आरोपीने जबरदस्तीने तरुणीकडून हिसकावलेला मोबाइल आणि रक्कम हस्तगत करून गुन्ह्याच्या कामी जप्त करायची आहे. गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे तपास करणे बाकी आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केला. तो ग्राह्य धरीत न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.