जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाचा गाभारा शुक्रवारी (दि.२६) सुवर्णप्रकाशानं न्हाऊन निघाला. सूर्याची तेजोमय किरणं थेट खंडेरायाच्या मूर्तीवर पडल्याने निर्माण झालेली प्रभावळ डोळे दिपवणारी होती.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जेजुरीतील खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांना प्रशासनाने व देवस्थानाकडून काही प्रमाणात बंधने घालण्यात आली आहे. तसेच यंदाच्या वर्षी सर्व यात्रा, उत्सव देखील रद्द करण्यात आले आहे.
मात्र, शुक्रवारी पहाटे भूपाळी आरती झाल्यावर उगवत्या सूर्यनारायणानं आपल्या किरणांनी खंडोबाच्या मूर्तीला अभिषेकच घातला. पूर्वेकडून मंदिर परीसरातील दीपमाळ, नंदीमंडप पार करून ही किरणं थेट मूर्तीपाशी पोहोचली. सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सुरू झालेला हा सूर्यकिरणांचा अभिषेक ७ वाजून २३ मिनिटांपर्यत सुरू होता. सूर्याची काही किरणे थेट मूर्तीवर तर काही किरणे समोर पडल्याने संपूर्ण गाभाऱ्यात सुर्यकिरणांच्या प्रकाशाने गाभारा उजळून निघाला होता. वर्षातून दोन वेळा सूर्यकिरणे गाभाऱ्यातील मूर्तीवर पडत असतात. मार्च महिन्यात २३ ते २५ मार्च आणि सप्टेंबर महिन्यातील याच २३ ते २५ सप्टेंबर तारखेदरम्यान असे दृश्य पहावयास मिळते. या दिवशी दिवस आणि रात्र समसमान असल्याने असा योग्य येत असल्याचे देवाचे पुजारी सचिन उपाध्ये यांनी सांगितले.
खंडेरायाच्या मूर्तीला झालेल्या सूर्यकिरणांच्या अभिषेकाचे साक्षीदार झाल्याचं समाधान आणि आनंद भाविकांच्या चेहऱ्यावरही पाहायला मिळाला.