- नम्रता फडणीस
पुणे : प्रथितयश कलाकारांच्या सुंदर चित्रकृतींसाठी लाखो रुपयांची बोली लागणे किंवा ते लाखो अथवा कोटींच्या घरात विकले जाणे ही गोष्ट आपण अनेकदा ऐकली असेल! पण इंटिरिअर डिझाइनचे शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षीय मुलाच्या चित्राला लाखाची बोली लागल्याचे सांगितले तर कदाचित आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. कॅटलिस्ट फॉर सोशल अॅक्शन (सीएसए) या स्वयंसेवी संस्थेने निधी संकलनासाठी आयोजित केलेल्या प्रदर्शनात त्याचे एक चित्र चक्क ३ लाख रुपयाला विकले गेले आहे. संस्थेतर्फे ही सर्व रक्कम त्याच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याने एका चित्रामुळे तो चक्क ‘लखपती’ झाला आहे.
आर्यन डोलारे असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सीएसए ही स्वयंसेवी संस्था अनाथ आणि निराधार मुलांना व मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करते. सध्या पुण्यातील ज्ञानदीप संस्थेसह पाच बालगृहांसोबत ही संस्था काम करीत आहे. गरजू मुलांचे कल्याण व पुनर्वसन करणे हा संस्थेचा हेतू आहे. अनाथ असलेला आर्यन इंटिरिअर डिझाईनिंगच्या दुसºया वर्षात शिकत असून, त्याच्या कोर्सचा संपूर्ण खर्च सीएसएस संस्था करीत आहे.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा आणि ओडिसा राज्यातील ६० पेक्षा अधिक बालगृह संस्थेशी संलग्न आहेत. यावर्षी मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सीएनएसच्या सर्व संलग्न बालगृहामधून ‘टॅलेंट शो’चे आयोजन करण्यात आले होते. या ६० बालगृहाच्या ३४०० मुलांमधील ३ ग्रुपडान्स, एक सोलो गायन आणि आर्यन डोलारे नावाच्या मुलाची चित्रे अंतिम फेरीमध्ये पोहोचली. निधी संकलनासाठी या कलागुणांचे प्रदर्शन तसेच इतर नामवंत चित्रकारांच्या कलाकृतीच्या लिलावामध्ये आर्यनच्या चित्रांचा लिलाव करण्याचा निर्णय संस्थेने घेतला. त्यासाठी आर्यनला मार्गदर्शक उपलब्ध करून देण्यात आला.
मुंबईमध्ये नुकताच हा कार्यक्रम झाला. त्यामध्ये आर्यनच्या एका चित्राची बोली १५ हजारांपासून लावण्यात आली आणि ती तीन लाखांपर्यंत पोहोचली.ते चित्र ३ लाखाला विकले गेले. तर उर्वरित दोन चित्रे २० हजार रुपयांना विकली गेली. ही सर्व रक्कम आर्यनच्या बँकेत जमा करण्यात येणार आहे. या रकमेतून त्याची वाटचाल स्वावलंबनाकडे होणार असल्याचे सीएनएसच्या प्रोग्रॅम मॅनेजर ल्युसी मॅथ्यू यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.