पुणे : लॉकडाऊनमध्ये काही कामधंदा नव्हता. त्यात पत्नीचे बाळंतपण झाले. आर्थिक प्रश्न उभा राहिला तेव्हा तो शहरात येऊन वाहनचोरी करुन लागला. बिबवेवाडी येथे संशयास्पदरित्या तो थांबला असताना बिबवेवाडी पोलिसांच्या हाती तो सापडला. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख रुपयांच्या ४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. अकबर हुसेन शेख (वय २७, रा. साखर ग्रामपंचायतीजवळ, ता. वेल्हा) असे या दुचाकी चोराचे नाव आहे.
याबाबत बिबवेवाडी पोलिसांनी सांगितले की, अकबर हा गावाकडे सेंटिंगचे काम करीत होता. लॉकडाऊनमध्ये त्याचे काम बंद होते. त्यात त्याच्या पत्नीचे बाळंतपण झाले. बेरोजगार असल्याने तो चार महिन्यांपूर्वी पुण्यात आला होता. त्यावेळी त्याने चावी असलेली एक दुचाकी चोरुन नेली होती. त्यानंतर त्याने अशाच प्रकारे आणखी ३ दुचाकी चोरल्या होत्या. त्यातील एक तो स्वत: वापरत होता. एक भावाला वापरण्यासाठी दिली होती.
सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर व त्यांचे सहकारी रविवारी दुपारी गस्तीवर होते. त्यावेळी पोलीस अंमलदार तानाजी सागर यांना बातमी मिळाली की, अप्पर बिबवेवाडीतील डॉल्फिन चौकात एक जण दुचाकीसह संशयास्पद स्थितीत थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक तेथे गेले. पोलिसांना पाहून अकबर पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशीत बिबवेवाडीतील २, सहकारनगर, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक अशा ४ गुन्ह्यातील वाहने जप्त करण्यात आली आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे, अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर, पोलीस उपनिरीक्षक दीपक मते, पोलीस अंमलदार अमित पुजारी, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी सतीश मोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.