पुणे : एका बड्या मोबाइल कंपनीने खोदाईमध्ये गैरप्रकार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी संबंधित कंपनीचे काम थांबवून त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांची दंडात्मक कारवाई केली होती. या कारवाईमुळे संबंधित मोबाइल कंपनीने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून सूत्रे हलवून बकोरिया यांची बदली करायला लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बकोरिया यांनी शहरात चुकीची कामे करणाऱ्यांविरुद्ध धडाका लावला होता. गैरप्रकार करणारे ठेकेदार, कंपन्या यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकले होते. त्यामुळे एका ठेकेदाराने आमदारांच्या मदतीने एक वर्षाच्या आतच बकोरिया यांची क्रीडा आयुक्त म्हणून बदली घडवून आणली होती. मात्र, स्वयंसेवी संस्थांकडून या बदलीला जोरदार विरोध झाल्यानंतर ती राज्य शासनाने मागे घेतली होती. मात्र, त्यानंतर एका बड्या मोबाइल कंपनीने त्यांची पूर्ण शक्ती पणाला लावून बकोरिया यांची बदली घडवून आणल्याचे उजेडात आले आहे. शहरामध्ये केबल टाकण्यासाठी मोबाइल कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात खोदाईची कामे सुरू आहेत. एका कंपनीने परवानगी घेतल्यापेक्षा खूप जास्त खोदाई केल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले. त्यानंतर बकोरिया यांनी त्या मोबाइल कंपनीवर कोट्यवधी रुपयांचा दंड आकारून त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा केला होता. ही कारवाई टाळण्यासाठी तडजोड करायला आलेल्या अधिकाऱ्यांची त्यांनी भेटही नाकारली होती. त्यानंतर चिडलेल्या त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीतील उच्चपदस्थांकडे बकोरिया यांची तक्रार केली. त्या उच्चपदस्थांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून बकोरिया यांची बदली करण्यास सांगितले. त्यानुसार बदलीचे आदेश काढण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.खोदाई प्रकरणामुळे महापालिकेमध्ये आयुक्तांसह प्रशासन दबावाखाली काम करीत असल्याची जोरदार टीका महापौर प्रशांत जगताप यांनी केली. या वेळी महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची बदली एका कंपनीच्या दबावातून झाली. त्यामुळे कंपनीच्या इशाऱ्यावर महापालिकेचा कारभार चालतो का, अशी विचारणा जगताप यांच्याकडे केली असता त्यांनी सांगितले, ‘‘सध्या अधिकारी ज्या प्रकारे दबावात काम करीत आहेत, त्यावरून बकोरिया यांची बदली याच कारणावरून झाली असावी, असा संशय वाटतो.’’
बकोरिया यांची बदली दबावामुळेच
By admin | Published: April 02, 2016 3:38 AM