पुणे : दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यानी केलेल्या आंदोलनानंतर दूध उत्पादकांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, गेल्या ५० दिवसांची अनुदानाची रक्कम थकल्याने दूध व्यावसायिकांनी अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दुधाची किंमत पाच रुपयापर्यंत वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. दूध अनुदान थकल्याच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक गुरुवारी रात्री पुण्यात आली. त्यात ५८ सहकारी आणि खासगी डेअरीचे ७६ प्रतिनिधी उपस्थित होते. दूध उत्पादकांना दर कमी मिळत असल्याने अनुदान देण्याचा निर्णय जुलै महिन्यात राज्यसरकारने घेतला. त्यानुसार आॅगस्ट महिन्याची रक्कम दूध उत्पादकांना देण्यात आली. सप्टेंबरच्या दहा तारखेपर्यंत उत्पादकांना ही रक्कम मिळाली. त्यानंतर आत्तापर्यतची रक्कम मिळालेली नाही. येत्या १५ डिसेंबर पर्यंत सरकारने अनुदान न दिल्यास अनुदानातून बाहेर पडण्याचा इशारा दूध संघाच्या प्रतिनिधींनी दिला. मात्र त्यानंतर दुदाची रक्कम वाढविणार की नाही याबाबत मात्र भाष्य करण्यास संघाच्या प्रतिनिधींनी नकार दिला. मात्र अनुदान योजनेतून बाहेर पडल्यानंतर दुधाची किंमत वाढविण्याशिवाय व्यावसायिकांकडे पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. राज्यातील गायीच्या दुधाचे दर १७ ते २० रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली आले होते. ग्राहकाला मात्र ते ४० ते ४२ रुपये प्रतिलिटरनेच दूध मिळत होते. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी संघटनेसह विविध शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांनी दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी १६ जुलैला राज्यव्यापी दूधबंद आंदोलन केले होते. दुधाच्या गाड्या अडवून दूध रस्त्यावर ओतून देणे, दुधाने जनावरांना आंघोळ घालणे, दुधाचे मोफत वाटप करणे, दुग्धाभिषेक करणे अशा विविध मार्गाने राज्यात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर १९ जुलैच्या रात्री दूध कोंडी फुटली. त्यात अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या नंतर उत्पादकांना गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ आणि म्हशीला ३६ रुपये देण्यात येत आहेत.
पेट्रोलनंतर दूध बघणार परीक्षा, सरकारने अनुदान न दिल्याने भाव भडकण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 8:35 PM
गेल्या ५० दिवसांची अनुदानाची रक्कम थकल्याने दूध व्यावसायिकांनी अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दुधाची किंमत पाच रुपयापर्यंत वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ठळक मुद्दे५० दिवसांपासून लिटरमागे ५ रुपयांचे अनुदान थकीत