कोरेगाव मूळ : पुणे जिल्हातील इतर महामार्गांप्रमाणेच पुणे-सोलापूर महामार्र्गावर अपघातांचे प्रमाण जास्तीचे आहे. मात्र यातील बहुतांश अपघात हे नियम न पाळल्याने होत आहेत. तसेच मार्गावरील गावांसाठी सर्व्हिस रोड नसल्याने वाहने उलट्या दिशेने येतात, याचाही मोठा धोका आहे.पुणे-सोलापूर हा पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील सर्वात मोठा महामार्ग आहे. हवेली, दौंड आणि इंदापूर तालुक्यातून हा महामार्ग जातो. या रस्त्यावर वाळू वाहतुकीचे प्रमाण मोठे आहे. तसेच, दक्षिण भारताला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने वाहनांची सततची वर्दळ असते. जड वाहनांचे प्रमाण अधिक आहे. त्यातच महामार्गालगतची गावे विकसित झाल्याने स्थानिक वाहतुकीचे प्रमाणही अधिक आहे.या महामार्गावर जानेवारी २०१७ ते जुलै २०१७ या सात महिन्यांच्या कालावधीत ३७ अपघात झाले. त्यापैकी १५ प्राणांतिक अपघातांमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला होता आणि जखमींमध्ये ३८ जण आहेत.प्रवास सुखकर आणि वेगवान व्हावा, तसेच अपघातांची संख्या कमी व्हावी, यासाठी पुणे-सोलापूर महामार्गाचे काम एनएचआय यांच्या माध्यमातून करण्यात आले. परंतु अपघातांची आजची आकडेवारी पाहता पहिलाच रस्ता बरा होता, असे म्हणायची वेळ प्रवाशांना येताना दिसत आहे आणि या अपघाताला कारण ठरतंय रस्त्यावर अनधिकृतपणेपार्किंग केलेली वाहने. काही महिन्यांपूर्वी उरुळी कांचन येथे डुक्कर आडवे आल्याने चालकाचा ताबा सुटून मिनी बसचा अपघात झाला. यात ११ जणांचा मृत्यू झाला होता. ट्रक आणि मोटारींच्या अपघातांची संख्या सर्वाधिक आहे़
सर्व्हिस रोड नसल्याने वाहने उलट्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:52 AM