जेजुरी : जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा सोमवारी (दि. ८) भरणार नसल्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यादिवशी सकाळी ११ वाजून ३२ मिनिटांनी अमावस्या सुरू होत असून ती मंगळवारी (दि. ९) ९ वाजून २७ मिनिटांनी संपते. सोमवारी उगवत्या सूर्याला अमावस्येचा स्पर्श होत नसल्याने देवाचा पालखी सोहळा काढण्यात येणार नाही. त्यामुळे सोमवती यात्रा भरणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवती यात्रेच्या नियोजनासाठी जेजुरी येथील ऐतिहासिक छत्री मंदिरात पालखी सोहळ्याचे मानकरी, खांदेकरी व ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश आगलावे, प्रमुख मानकरी राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, रमेश राऊत, छबन कुदळे, अरुण खोमणे, सुरेंद्र नवगिरे, कृष्णा कुदळे, पंडित हरपळे, दिलावर मणेर, गणेश डिखळे, दत्तात्रय सकट, दिलीप मोरे, शिवाजी शिंदे, रवींद्र झगडे, नगरसेवक महेश दरेकर, पुरोहित शशिकांत सेवेकरी, श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, माजी विश्वस्त राजेंद्र बारभाई, तसेच खंडोबा पालखी सोहळ्याचे, खांदेकरी, मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. सोमवारी (दि. ८) सकाळी ११ वाजून ३२ मिनिटांनी अमावस्या सुरू होत असून, मंगळवारी ही अमावस्या पंचांगात दाखविण्यात आली आहे. तसेच बुधवारी प्रतिपदा असल्याने सोमवती यात्रा भरणार की नाही, याबाबत मोठी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. या बैठकीत सर्व पालखी सोहळ्याचे मानकरी, खांदेकरी व ग्रामस्थ यांची चर्चा झाली. पालखी सोहळ्याची मागील रुढी, परंपरा पहाटे सूर्याला अमावस्येचा स्पर्श होत नसल्याने, तसेच रविवारी पालखीसाठी शेडा देता येत नसल्याने, घटस्थापना बुधवारी होत असल्याने पालखी सोहळा काढता येणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर प्रमुख मानकरी राजेंद्र पेशवे यांनी सोमवारी सोमवती यात्रा भरणार नसल्याचे जाहीर केले.या बैठकीत देवसंस्थानने घटनादुरुस्तीसाठी धमार्दाय आयुक्त कार्यालयात अर्ज केला असून सण, उत्सव, गावाच्या परंपरा, मानकरी, खांदेकरी यांचे हक्क कायम अबाधित ठेवावेत, तसेच ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच घटना दुरुस्त करावी, अशी मागणी केली. खंडोबा देवाच्या घोड्यासाठी पागा बांधण्याचा अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित होता. गडाच्या पायथ्याशी कडेपठार रस्त्यालगत या पागेसाठी खंडोबाभक्त संतोष खोमणे यांनी पाच गुंठे जागा देणार असल्याचे या बैठकीत जाहीर केले.
सूर्याला अमावस्येचा स्पर्श होत नसल्यामुळे जेजुरीत भरणारी सोमवती यात्रा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 8:57 PM
सोमवारी (दि. ८) सकाळी ११ वाजून ३२ मिनिटांनी अमावस्या सुरू होत असून, मंगळवारी ही अमावस्या पंचांगात दाखविण्यात आली आहे. तसेच बुधवारी प्रतिपदा असल्याने सोमवती यात्रा भरणार की नाही, याबाबत मोठी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.
ठळक मुद्देजेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा भरणार नसल्याचा ग्रामस्थांचा निर्णय