पुणे: तुम्ही राजकारणात येत नाहीत, राजकारण वाईट म्हणता, म्हणूनच ते वाईट होत जाते. राजकारणाचा स्तर खालावला आहे तर त्याला तुम्हीच जबाबदार आहात, दर्जा उंचवायचा असेल तर तुम्ही राजकारणात सक्रिय व्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या भेटीसाठी आलेल्या नागरिकांना सांगितले. माझ्याच पक्षात या असे माझे म्हणणे नाही, कोणत्याही पक्षात जा, पण राजकारणात जा असे ते म्हणाले.
एका स्वयंसेवी संघटनेच्या व्याख्यानमालेत बोलताना काही महिन्यांपूर्वी राज यांनी सर्वसामान्य नागरिकांना राजकारणात येण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून काही स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी त्यांना भेटीची वेळ मागितली होती. आश्चर्य असे की राज यांनी ही वेळ दिली. तब्बल २ तास शहरातील एका बागेत बसून त्यांनी या नागरिकांबरोबर चर्चा केली. राजकारणाचा तिरस्कार करू नका, त्यामुळे ते अधिकच वाईट होत चालले आहे. राजकारणात या, काम करा, त्यामुळे स्तर बदलेल असे त्यांनी या नागरिकांना सांगितले.
भावडोळस या दृष्टिहिनांच्या संस्थेच्या पदाधिकारी रेणू कोडीलकर या गर्दीत होत्या. त्यांनी भावडोळस मुलांच्या प्रवासी वाहतूकीची अडचण सांगितले. अशा अडचणी राजकारणाच्या माध्यमातून सोडवता येतात असे स्पष्ट करून राज यांनी लगेचच मनसेचे नेते बाबू वागसकर यांना या मुलांच्या प्रश्नात लक्ष घालण्यास सांगितले. समजा तुम्हीच एखाद्या पक्षाच्या पदाधिकारी आहात तर ही समस्या तुम्हीही तातडीने सोडवू शकता असे ते म्हणाले. माझ्या पक्षातच या असे नाही, पण कोणत्यातरी पक्षात जाऊन काम करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
चिखल साफ करायचा असेल तर तो त्यापासून लांब राहून नाही तर त्यात उतरूनच स्वच्छ करावा लागतो असे ते म्हणाले. मनसेचे वागसकर तसेच अनिल शिदोरे, गणेश सातपुते, वसंत मोरे, किशोर शिंदे, योगेश खेॅरे, बाळा शेडगे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित युवकांनाही राज यांनी राजकारणात काम करण्याचे आवाहन केले. तुमची कला, तुमचा आवेश तिथे दाखवा असे त्यांनी सांगितले.
राज यांचा स्वभाव रागिष्ट असल्याचे माहिती होते, त्यामुळे भेटीला जाताना दडपण होते, मात्र त्यांनी स्वत:च वातावरण एकदम खेळकर केले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी आमच्याबरोबर मनसेचे पदाधिकारी पीएमपीएल च्या ऑफिसमध्ये आले. व्यवस्थापकीय अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्याबरोबर त्यांनी भेट घालून दिली व आमच्या भावडोळस मुलांच्या प्रवासाचा प्रश्न सुटला.