चंदननगर: शहरात कोरोनाचा उद्रेक होत असताना आरोग्य व्यवस्था देखील पूर्णपणे कोलमडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना प्रशासन आरोग्य व्यवस्था उत्तम असल्याचे व रुग्णांना सहज बेड्स उपलब्ध होत असल्याचे ठामपणे सांगत आहे. मात्र रात्रभर कोरोना पॉझिटिव्ह आईला गाडीतून फिरवून देखील वेळेवर बेड व योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्याने हतबल झालेल्या मुलासमोर एक आईने गाडीतच प्राण सोडल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे.
रामवाडी गावातील अरुलमेरी अँन्थनी(वय ७३ ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना गुरुवारी (दि.१) रोजी कोरोनाची लागण झाली असल्याचे निदान झाले. आरकीदास अँथनी हा मुलगा स्वत: कोरोना पॉझिटिव्ह असताना आईला रात्री आठ वाजता येरवड्यातील संत ज्ञानेश्वर वसतीगृहातील कोरोना सेंटर घेऊन आला. तेथील अधिकाऱ्यांनी रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली आहे. तुम्हाला ऑक्सिजनची आवश्यकता भासू शकते असे सांगत त्यांना ससूनला पाठवले. मात्र, सासूनमध्ये ऑक्सिजन बेड शिल्लक नसल्याने त्यांना रुग्णालयाच्या बाहेर बेडची वाट पहावी लागली.
काही वेळाने रुग्णाच्या मुलाने जम्बो कोविड रुग्णालयामध्ये गाठले. तिथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अगोदर हेल्पलाईनवर माहिती द्या. हेल्पलाईनच्या समृपदेशकांनी सांगितल्यानंतर आम्ही बेड देऊ असे सांगितले. कोविड सेंटरचा हेल्पलाईन क्रमांक दीड तास व्यस्त होता. दीड तासानंतर समुपदेशकांनी माहिती घेतली. तुम्हाला पाच मिनिटांमध्ये कळवतो असे सांगितले. पण, त्यानंतर माणूस गेला तरी हेल्पलाईनवरून कोणताही निरोप आला नाही.
कोविड हेल्पलाईनवरील डॅश बोर्डमध्ये अनेक रुग्णालयामध्ये ऑक्सिजन आणि वेंटिलेटर बेड उपलब्ध असे दाखवत होते. पण, रुग्णालयामध्ये गेल्यावर बेडच उपलब्ध नसल्याचे सांगितले जात होते. आईला बेड मिळावा यासाठी त्यांच्या मुलाने शहरातील सर्व रुग्णालयामध्ये जाऊन बेडची चौकशी केली. पण रुग्णालयामध्ये बेड नसल्याचे सांगितले जात होते.
★★★
मेल्यावरही मृतदेह मिळवण्यासाठीही धडपडच....
सकाळी साडेआठ वाजता गाडीतच मृत पावलेल्या अरूलनेरी अँथनी याचा मृतदेह संध्याकाळी सहा वाजता मिळाला. एकटा मुलगा आरकीदास याला कोरोना पॉझिटिव्ह आई गेल्यावर सुद्धा ससूनमध्ये अक्षरक्ष: दहा तास ताटकळावे लागले.अतिशय वाईट स्थिती कोरोनाने घेतली असल्याने बेड अभावी रस्त्यावर मृत होत आहेत.
★★★
कोरोनामुळे आईला ऑक्सिजन बेडची गरज होती. कोरोना हेल्पलाईन सतत व्यस्त होती. शहरातील सर्व रुग्णालयामध्ये जाऊन आलो. पण, बेड उपलब्ध नसल्याने रुग्णालयात दाखल करून घेत नव्हते. ऑक्सिजनची गरज असल्याने आईला पोर्टेबल ऑक्सिजन बॉटलने ऑक्सिजनचा पुरवठा केला. पण सकाळी ऑक्सिजनची मात्रा खुपच कमी झाली. माझी आई उपचाराविना रस्त्यामध्ये गेली. पालिकेच्या हेल्पलाईनवरून काहीच मदत मिळाली नाही. प्रशासन सांगते ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहे. मात्र, प्रत्यक्षात रुग्णालयामध्ये एकही बेड उपलब्ध नाही. जम्बो कोविड आणि ससून मध्ये रुग्णालयामध्ये जागा मिळाली नाही.
- आरकीदास अँथनी, मृताचा मुलगा