चाकण : येथील वाहतूक पोलीस, नगरपरिषद आणि नाणेकरवाडी ग्रामपंचायतने संयुक्त कारवाई करीत तळेगाव चौक ते माणिक चौक यादरम्यान वाहतूककोंडीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या व पथारी व्यावसायिकांना मागील आठवड्यात मोठा गाजावाजा करत हटवण्यात आले होते, मात्र ‘येरे माझ्या मागल्या’ या म्हणीप्रमाणे व्यावसायिकांनी पुन्हा रस्त्याच्या दुतर्फा ठाण मांडले असल्याचे दिसून येत आहे.
चाकण-शिक्रापूर हा महामार्गावर नेहमीच नागरिकांसह वाहनांची मोठ्या संख्येने येजा असते. महामार्गाच्या तळेगाव चौक ते माणिक चौक यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा किरकोळ भाजीपाला व फळे विक्रेत्यांसह विविध प्रकारच्या वस्तू विकणाऱ्या हातगाड्यांसह पथारी व्यावसायिकांनी ठाण मांडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा बसत असलेल्या या भाजीपाला व हातगाडी विक्रेत्यांमुळे सतत वाहतूककोंडी होत असून पादचारी व प्रवाशांना मार्ग काढणे धोकादायक ठरत आहे.
भाजीपाल्यांसह विविध वस्तू खरेदी करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी अनेकांची लगबग दिसून येते. खरेदीच्या नादात अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथील ग्रामीण रुग्णालयात व एसटी बस स्थानकात नेहमीच नागरिकांची येजा सुरू असते,तर एसटी बस स्थानकात वळवतना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गावर अवजड वाहनांसह लहान मोठ्या वाहनांची सतत वर्दळ सुरू असते.
मागील आठवड्यात चाकण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी आणि नाणेकरवाडी ग्रामपंचायत प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा गाजावाजा करीत वरील चौकाच्या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या व पथारी व्यावसायिकांवर कारवाई करीत त्यांना हटवण्यात आले होते.परंतु केलेल्या कारवाईकडे दुर्लक्ष करत काही दिवसांतच हातगाड्या व पथारी व्यावसायिकांनी या रस्त्याच्या ठाण मांडले असल्याचे दिसून येत आहे.तात्पुरत्या कारवाईचा फार्स करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
१४ चाकण
चाकण एस.टी.बस स्थानकासमोरील महामार्गवर हातगाड्या व पथारी व्यवसायिक.