पुणे : धानोरी भागातील संकल्पनगरी सोसायटी मधील एका फ्लॅटच्या बेडरूमला बुधवारी दुपारी आग लागली. या आगीत बेडरूम जळून खाक झाले. आग लागली तेव्हा घरात कोणीही नसल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही. परंतु सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
धानोरी भागातील संकल्पनगरी सोसायटी मधील एका बंद फ्लॅटला दुपारी 4 च्या सुमारास आग लागली. फ्लॅटमधील बेडरूम मध्ये आग लागली. घरातील रहिवाशी कामानिमित्त बाहेर गेले होते. घरातून धूर येऊ लागल्याने आग लागल्याचे येथील राहिवाशांच्या लक्षात आले. सोसायटीतील तरुणांनी घराचा दरवाजा तसेच खिडक्या फोडून घरात प्रवेश केला. योगेश दसाडे, आनंद गौड या दोघांनी हिंमत दाखवत घरातील दोन सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर सोसायटी मधील मधुर घोगरे, बाबा बिराजदार आणि इतर रहिवाश्यांनी पाणी मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळात अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांनतर कुलिंग ऑपरेशन करण्यात आले.
दरम्यान बेडरूम मधील बेड ला सर्वप्रथम आग लागल्याने तेथील बेड तसेच कपडे व इतर साहित्य जळून खाक झाले. यावेळी घरात सापडलेले 9200 रुपये जवानांनी सोसायटीचे चेअरमन उत्तम अडसुळे यांच्याकडे सुपूर्त केले. आग विझवण्याचे काम येरवडा अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी सुभाष जाधव, तांडेल सुनील देवकर, फायरमन भाऊसाहेब चोरमले, सुनील पाटोळे, ड्रायव्हर सुनील धुमाळ यांनी केले. दरम्यान शॉक सर्किटमुळे आग लागण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.