लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : शहरातील कोरोना संकट रोखण्यासाठी बारामती आता ‘हायटेक’ बनली आहे. एका क्लिकवर कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक माहिती उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सॉफ्टवेअर विकसित करण्याची सूचना केल्या होत्या. त्यानुसार हे अत्यंत महत्वाचे पाऊल पडले आहे. त्यामुळे बारामतीकरांना दिलासा मिळणार आहे.
शहरातील कोरोनासंदर्भातील परिपूर्ण माहिती या प्रणालीद्वारे एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. या साठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांसह कोणालाही यावर आवश्यक माहिती उपलब्ध होणार आहे. स्टर्लिंग सॉफ्टवेअर सिस्टिम्सचे प्रमुख सतीश पवार यांनी हे संकेतस्थळ विकसित केले आहे. तर नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने त्यांना सर्व माहिती पुरविण्यात आली आहे, अशी माहिती नटराजचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली. http://dashboard.covidcarebaramati.com या वेब पोर्टलवर क्लिक केल्यास बारामती शहरामध्ये कोविड रुग्णांसाठी उपलब्ध असणारे शासकीय व खाजगी रुग्णालय तेथील उपलब्ध बेड, डॉक्टरांचे क्रमांक, कोरोनाग्रस्त गर्भवती महिलांसाठीचे रुग्णालय, कोरोनाग्रस्त बाल रुग्णालय कोविड केअर सेंटरची माहिती फोन नंबर यात दिले आहे.
बारामती मधील स्वॅब घेतले जातात, त्या केंद्राची नावे व माहिती, बारामती शहरांमध्ये कोविडबाबत घडणाऱ्या रोजच्या घडामोडी तसेच बारामती शहरात लसीकरण केंद्र कुठे आहे? लस कधी उपलब्ध होईल, याबाबतची अधिक माहिती व या संदर्भातील केंद्राचे आवश्यक ते दुरध्वनी क्रमांक, कोविड रुग्णांकरिता रुग्णवाहिका सेवा, त्यांचे फोन नंबर, कोरोनाने मृत झालेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी असणाऱ्या सेवेचा फोन नंबर यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. बारामती शहर व तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना माहिती मिळण्यासाठी हे माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये सोबत दिलेल्या गरजू व्यक्तींनी हेल्पलाइन नंबर ७३८७९६०००० ला संपर्क साधून सोबत नमूद केलेल्या वेबसाईटला http://dashboard.covidcarebaramati.com भेट देऊन माहिती मिळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.