चाकण : बीड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरारी झालेल्या कुख्यात गुन्हेगारास चाकण वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून प्रचंड वाहतूक कोंडी असलेल्या चाकणच्या तळेगाव चौकात मोठ्या शिताफीने अटक करून बीड पोलिसांच्या ताब्यात दिले. बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुविख्यात गुन्हेगार संजय रामदास पवार (रा.बीड ) हा स्कॉर्पिओ गाडी क्रमांक (एम एच.०६बीएम २४७७ ) मधून भोसरी ते चाकण मार्गे जात होता.
या आरोपीवर खुनाचा प्रयत्न, जबरी चोऱ्या असे २० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. बीड पोलिसांचे एलसीबी पथक भोसरी येथे याच आरोपीच्या मागावर आले होते. मात्र त्यांना गुंगारा देऊन संबंधित आरोपी पुणे नाशिक महामार्गाने स्कॉर्पिओ वाहनातून पळून जात होता. अशी माहिती बीड एलसीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दुलत यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तलयातील चाकण वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक नम्रता डावरे यांच्याशी संपर्क साधून वरील चारचाकी स्कॉर्पिओ वाहनातून पळून जाणाऱ्या गुन्हेगाराची माहिती दिली.
पोलीस उपनिरीक्षक नम्रता डावरे यांनी अनंत रावण,वैशाली पानसरे, प्रवीण कासार,चंद्रकांत गाडे,प्रकाश वाजे,खेडकर या आपल्या सहकार्यांना सगळी माहिती देऊन तळेगाव चौकात सापळा रचून संजय पवारला वाहनासह पकडण्यात पोलिसांना यश आले.