पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व राज्यकर्त्यांनी आणि विरोधी पक्षांनी असे करणे टाळावे. बीड यापूर्वीही सुरक्षित होते, आताही आहे आणि यापुढेही सुरक्षित राहील. बीडची काळजी करण्याची गरज नाही, असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.एका कार्यक्रमासाठी बुधवारी पुण्यात आले असता बावनकुळे माध्यमांशी बोलत होते. मुंबईमध्ये अदानी कर लादला जात असल्याची टीका शिवसेनेचे (ठाकरे) युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्यासंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले, त्यांच्याकडे बोलण्यासाठी दुसरे काही शिल्लक नाही. ते सरकारवर बोलू शकत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरी बसून सरकार चालविले. ते केवळ दोन दिवस मंत्रालयात आले होते. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोलावे. मोदी आणि शाह यांच्याबद्दल बोलण्याएवढी अंधारे यांची उंची नाही, असेही बावनकुळे म्हणाले.रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून सध्या वाद सुरू आहे. त्यासंदर्भात महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून लवकरच निर्णय घेतील. मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार असताना मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. मराठा समाजाला न्याय मिळावा, हीच सरकारची भूमिका आहे, असेही त्यांनी नमूद केले.
बीड पूर्वीही सुरक्षित होते आणि आताही सुरक्षितच : चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:05 IST