पुणे- सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या काही पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या हल्ल्यात आठ ते दहा पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत. सिंहगडावर दर रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात.
गडावरील कल्याण दरवाज्याजवळ ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेनंतर किल्ल्यावरील सर्व पर्यटकांना सुरक्षित पणे खाली आणण्यात आले. तसेच जखमी पर्यटकांना रुग्णवाहिकेतून पुण्यातील रुग्णालयात आणले गेले आहे.
मधमाशांचा हल्ल्यानंतर, पर्यटकांना कोंढनापूर फाट्यावर सुरक्षित आणण्यात आले असून परिस्थिती आटोक्यात आली आहे, अशी माहिती वन अधिकारी भाऊसाहेब लटके यांनी दिली. या घटनेत २-३ जण बेशुद्ध झाल्याचीही माहिती मिळत आहे. माहिती मिळताच, आगीचा टेंबा व घोंगडी घेत स्थानिक अमोल पढेर आणि वन संरक्षण समितीच्या सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली.