पुणे : लॉकडाऊनचा कालावधी निसर्गासाठी उपयुक्त ठरला असून, मधमाशी यांना देखील पोषकमय झाला आहे. या कालावधीत शहरात मधमाशांचे पोळ चांगल्या प्रकारे निर्माण झाले आणि त्यांना मानवी हस्तक्षेप किंवा प्रदूषणाचा त्रास झाला नाही. त्यामुळे एका कॉलनीत ८ ते ९ राणीमाशी तयार झाल्या. ज्या एरवी तीन ते चार होतात. तसेच मध देखील चांगला मिळाला अशी माहिती मधमाशीचे संवर्धन आणि अभ्यास करणारे अमित गोडसे यांनी दिली.
लॉकडाऊनमध्ये शहरातील कोथरूड, वारजे, हडपसर, औंध, हिंजेवाडी या परिसरात पोळ अधिक प्रमाणात दिसून आले. या परिसरात फुले, फळे अधिक प्रमाणात फुलतात आणि शेतीचा भाग असल्याने मधमाशांना खाद्यही चांगले होते. मधमाशांना शंभर फुटांपेक्षा अधिक जागा पोळ तयार करायला लागते. ते या परिसरातील इमारतींवर करत असल्याचे दिसले. कारण इथे उंच उंच इमारती आहेत. गेली चार महिने मानवी हस्तक्षेप नसल्याने माशांना चांगला वावरता आले आणि एका ठिकाणी राहता आले. कारण त्यांचा त्रास नागरिकांना झाला नाही. कोरोनाची भीती मनात होती. म्हणून मधमाशांना हलविण्यासाठीही आम्हाला काँल्स आले नाहीत. अन्यथा एरव्ही खूप काँल्स येतात.कीटक किंवा इतर गोष्टींसाठी नागरिक औषध फवारणी किंवा पेस्ट कंट्रोलचा परिणाम मधमाशांवरही होत असतो. पण लाँकडाऊनमध्ये औषध फवारणी झाली नाही. ही गोष्ट मधमाशांसाठी पोषक ठरल्याचे गोडसे यांनी सांगितले.
------------
लॉकडाऊनचा असाही परिणाम मधमाशापालन करणारे विजय महाजन म्हणाले, लाँकडाऊनचा मधमाशांवर चांगला परिणाम झाला. प्रदूषणरहित मध उपलब्ध झाला. पण दुसरा फटकाही बसला. कारण ग्रामीण भागात ४० पेट्या ठेवल्या होत्या. त्यांची देखरेख करण्यासाठी लाँकडाऊन असल्याने जाता आले नाही. त्यातील ३० पेट्या खराब झाल्या.''
------------------------------
एसी च्या ठिकाणी धोका इमारतीमध्ये एसी लावला जातो. तेव्हा पाण्यासाठी पाइप भिंतीबाहेर काढतात. तेथील जागा व्यवस्थित बंद न केल्याने मधमाशा आता जाऊन पोळ करतात. पक्षी, कीटकांनाही ही जागा धोकादायक ठरते. म्हणून नागरिकांनी पाइप बाहेर काढल्यावर तेथील जागा पूर्ण बंद करायला हवी, अशी अपेक्षा अमित गोडसे यांनी व्यक्त केली.
------------------------------------
कुंडीत फुलं, फळ जोपासावीत नागरिकांनी कुंडीत फुलं, फळं लावावीत. जेणेकरून मधमाशांसाठी खाद्य उपलब्ध होईल. तसेच जागा असेल तिथे तुळशी, नारळ, आंबा, जांभुळ, तूती, तामण अशी झाडं लावली पाहिजेत. त्यामुळे मधमाशांचा वावर वाढेल, असे गोडसे म्हणाले.
--------------