पुणे : राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राबविल्या जात असलेल्या डीएड अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीला बुधवारी सुरुवात केली. डी.एड अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागांपेक्षा प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने यंदाही सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तसेच येत्या १५ डिसेंबरपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत.
डीएड, बीएड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगार उपलब्ध होत नाही. त्यातच लाखो विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला असून प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी घेतली जाणारी टीईटी परीक्षा दिली आहे. मात्र, राज्य शासनाकडून शिक्षक भरती नियमितपणे केले जात नाही. परिणामी गेल्या काही वर्षांपासून डी.एड अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी २१ हजार १६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात केवळ १२ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला. त्यामुळे मागील वर्षापेक्षा यंदा डी.एडला अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८ हजार ६८२ ने घटली आहे.
राज्यात डी.एड अभ्यासक्रमाची ६५४ महाविद्यालये असून त्यांची प्रवेश क्षमता ३५ हजार ८१४ एवढी आहे. त्यात शासकीय कोट्याच्या २३ हजार ६०५ तर व्यवस्थापन कोट्याच्या १२ हजार जागा आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले. प्राप्त अर्जांची छाननी करून प्राथमिक गुणवत्ता यादी ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली तर अंतिम गुणवत्ता यादी १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाली. पहिल्या गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना येत्या ५ डिसेंबरपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे. तर प्रवेशाची दुसरी फेरी ७ ते १२ डिसेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी १२ ते १६ डिसेंबर या कालावधीत राबविली जाणार आहे.