पुणे : महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ व आरोग्य व विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघाच्या वतीने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करून उच्च शिक्षण संचालनालय कार्यालसमोर विविध मागण्यांसाठी ग्रंथपालांच्या बेमुदत साखळी उपोषणास गुरुवारपासून (दि.१२) बेमुदत साखळी उपोषणास सुरूवात करण्यात आली.
भारतातील ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त १२ आॅगस्ट हा दिवस ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी देशात ग्रंथपालांचा यथोचित गौरव केला जातो. मात्र, महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेऊन पात्रता संंपादन करूनही ग्रंथपालांना हक्काची नोकरी मिळविण्यासाठी उपोषणाला बसावे लागत आहे, अशी खंत महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र ज्ञानोबा भताने यांनी व्यक्त केली.
डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे महासंघाचे विश्वस्त दिलीप भिकुले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष प्रदीप बागल, आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप चोपडे, राजेश अगावणे, डॉ. प्रवीण पंडित, प्रवीण घुले, आनंद नाईक, चित्रांगिनी टाक, सरिता स्थूल, वैशाली पानसरे उपस्थित होते.
अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपाल पदांची भरती ही प्राचार्य पदाच्या धर्तीवर तात्काळ सुरू करावी. ४ मे २0२0 रोजी पदभरतीवर निर्बंध लादण्याअगोदर ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार पदभरतीची परवानगी (एनओसी) मिळाली आहे, अशा महाविद्यालयांना तेथील पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी. तसेच खासगी विनानुदानित संस्थेमधील ग्रंथपालांना समान काम समान वेतन हे धोरण ठेवून विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केलेल्या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळावे या मागण्यांसाठी ग्रंथपालांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.
-----------------------------------------