चाकणमध्ये होणारी वाहतूककोंडी हा लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. त्यामुळे निवडणुका पार पडल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी सातत्याने नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली होती. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंद्रायणी नदी (मोशी) ते चांडोली या १७/७०० कि. मी. लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुमारे ६४८.८४ कोटींच्या या कामासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२१ असून १८ जानेवारी रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन मार्च महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
चौकट :
नाशिक फाटा ते मोशी रस्त्याचा प्रश्नही निकाली काढणार
नाशिक फाटा ते मोशी या पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील लांबीतील भूसंपादनाच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याने या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचे दोन भाग करण्याची भूमिका डॉ. कोल्हे यांनी लावून धरल्यामुळेच चाकणच्या तळेगाव चौक व एमआयडीसी चौकातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून या पाठोपाठ नाशिक फाटा ते मोशी या लांबीतील भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्याची लवकरात लवकर निविदा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.