पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जाणाऱ्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या तयारीस सुरुवात झाली असून महाविद्यालयांना येत्या सोमवारपर्यंत नावनोंदणी, तुकड्या, प्रवेशक्षमता आदींसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, असे पुणे विभागीय शिक्षण सहसंचालक मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे प्राचार्यांचे नाव बदलणे, शुल्कवाढ, विषयबदल करणे, तुकडीवाढ करणे किंवा बंद करणे आदी गोष्टींची नोंदणी केली जात आहे. मात्र, नव्याने मान्यता मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. त्यामुळे या महाविद्यालयांसाठी येत्या सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांनीसुद्धा नावनोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही राऊत यांनी सांगितले. दहावीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळावा, या उद्देशाने आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. आॅनलाईन प्रवेशासाठी नोंदणी न केलेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही, असेही शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले.
अकरावी प्रवेशाच्या तयारीस सुरुवात
By admin | Published: April 10, 2016 4:13 AM