ऑनलाईन आयोजन : डॉ. दाभोलकर हत्येस २० ऑगस्टला आठ वर्षे पूर्ण होणार
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक आणि समाजवादी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येस येत्या २० ऑगस्टला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त डॉ. दाभोलकर यांना अभिवादनासाठी अंनिसतर्फे १४ ते २० ऑगस्टदरम्यान डॉ. दाभोलकर विचार जागर सप्ताहाचे आयोजन केले आहे. यातील सर्व कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी सहापासून होतील.
शनिवारी (दि.१४) ‘अंध रूढींच्या बेड्या तोड अभियान’ या विषयावर नंदिनी जाधव बोलतील. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची उपस्थिती असेल. रविवारी (दि. १५) ‘हिंसा के खिलाफ... मानवता की और’ या विषयावर अंशुल छत्रपती यांची मुलाखत होणार आहे. सोमवारी (दि.१६) ‘सामाजिक चळवळी आणि माध्यमे’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे हे विचार मांडतील. मंगळवारी (दि.१७) बालसाहित्यावरील पाच पुस्तकांचे प्रकाशन होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुशील शुक्ल उपस्थित असतील.
बुधवारी (दि.१८) ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ या विषयांवर परिसंवादाचे आयोजन केले. असून, अध्यक्षस्थानी डॉ. विवेक मॉन्टेरो असतील. गुरुवारी (दि.१९) भोर येथे ५० व्यक्तींच्या उपस्थितीत विचार संमेलन होईल. यावेळी डॉ शैला दाभोलकर, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर आदी उपस्थित राहतील. शुक्रवारी (दि.२०) ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ ‘भारतीय लोकतंत्र व विवेकवादी शक्तीसमोरील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करतील. हे सर्व कार्यक्रम अंनिसच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह प्रसारित होतील.
१९ ऑगस्टला सायंकाळी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर मेणबत्ती घेऊन अभिवादन केले जाईल. तर २० ऑगस्टला सकाळी आठलाही अभिवादनाचा कार्यक्रम होईल.