पुणे - साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर कारखान्यांवर कारवाईचे तसेच शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी रात्री 10.30 वाजता खासदार राजू शेट्टी यांच्याकडे लेखी पत्र दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. मात्र, लेखी आश्वासनानंतरही कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारात राजू शेट्टींनी दिला.
ऊसाला एफआरपी मिळावी या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुण्यातील अलका चौकापासून ते साखर संकुल पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी योगेंद्र यादव यांच्यासोबतच हजारो शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यांना विकल्यानंतरही अनेक कारखान्यांकडून त्यांना अद्याप एफआरपीचा एक रुपया सुद्धा मिळाला नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला. एफआरपी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये कारखान्यांमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ऊसाची एफआरपी मिळावी अशी मागणी या मोर्चाच्या वतीने करण्यात आली. दुपारी 1.30 च्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली होती. हजारो शेतकरी अलका चौकात जमा झाले होते. खासदार राजू शेट्टी आल्यानंतर त्यांनी नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेत मोर्चा काढण्याचे आवाहन केले. पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयाजवळ राजू शेट्टींच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते. अखेर, रात्री 10.30 वाजता साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर कारखान्यांवर कारवाईचे तसेच शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. कारवाईचे पत्रच शेखर गायकवाड यांनी राजू शेट्टींना दिले आहे.