लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गतवर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कलाविश्व जे पूर्णत: ठप्प झाले, ते अजूनही म्हणावे तसे सावरू शकलेले नाही. घरात मी एकटाच कमावणारा आहे. नाट्यगृहांमध्ये विशेष प्रयोग होत नसल्यामुळे हाताला वर्ष झाले काम नाही. मग कुठं शिफ्टिंगची तर कुठं कार वाॅशिंगची कामे कर... असे करून गुजराण करीत आहे... ही व्यथा आहे नाटकांसाठी नेपथ्याचे काम करणारे गणेश माळवदकर यांची. शिवरात्रीपासून त्यांनी बालगंधर्व रंगमंदिराबाहेर थंडगार ताकाची गाडी लावली आहे. यातूनही त्यांचा केवळ ५०० रूपयांपर्यंत धंदा होतो. यात कुटुंबाची गुजराणसुद्धा होत नाही... हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.
माळवदकर यांच्यासारख्याच पडद्यामागच्या कलाकारांसह सांस्कृतिक क्षेत्रातील असंख्य कलाकारांची हीच कहाणी आहे. कोरोना आहे मान्य; पण आता कुठं शासनाने सर्व सुरळीत सुरू केलं होतं. पुन्हा लॉकडाऊन केलं तर आमचं जगणं दिवसेंदिवस कठीण होणार आहे. सांगा कसं जगायचं असा आर्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या वर्षीपासून कोरोनाने पुण्याला विळखा घातला आहे. त्यामुळे कलाकारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. दोन महिन्यांपासून सर्व सुरळीत होण्याचे चिन्ह निर्माण होत असताना आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. पुन्हा काम बंद झाले तर कलाकारांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. हाताला काम नसल्याने अनेक कलावंतांनी पर्यायी व्यवसायाची वाट निवडली आहे. मात्र, त्यातून काहीच पैसे मिळत असल्याने कुटुंबाची गुजराण करण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे कलाकारांचे म्हणणे आहे.
---
आम्ही तेरा वर्षांपासून नाट्यगृहांमध्ये कार्यक्रमांसाठी लाईट आणि साऊंडची कामे करीत आहोत. दरवर्षी एप्रिलमध्ये सिझन फुल्ल असतो. पण गेल्या वर्षभरापासून हाताला काम नाही. कुटुंबाची गुजराण करण्यासाठी आम्ही पासर्लसेवाची कामे करतो. त्याला आम्ही टेम्पो घेऊन लावला आहे. मात्र, डिझेलचे दर वाढल्यामुळे जेमतेम काहीच पैसे सुटतात.
- अतुल गायकवाड, प्रशांत भोसले आणि गणेश शेडगे (लाईट अँड साऊंड कलाकार)
---
अनेक कलाकारांचे हातावर पोट असते. प्रत्येक शो किंवा प्रयोगासाठी त्यांना पैसे मिळत असतात. गेल्या वर्षी कडक लॉकडाऊनमुळे कलाकारांवर बिकट परिस्थिती ओढवली होती. मात्र लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे ५० टक्के क्षमतेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यात आले होते. त्यातून कलाकारांना एक दिलासा मिळाला होता. सर्व पुन्हा बंद झाले तर अजून अवघड होईल. त्यामुळे कलाकारांचे कार्यक्रम ५० टक्के क्षमतेनुसार सुरू राहावेत, अशी आमची मागणी आहे.
- गिरीश परदेशी, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभाग