लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील पडद्यामागील कलाकार-तंत्रज्ञांचा प्रत्येकी दोन लाखांचा विमा मोफत काढून देणार असल्याची घोषणा प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांनी केली.
संवाद पुणेतर्फे वृद्ध-गरजू कलाकारांसाठी लसीकरण मोहीम राबवण्याचा तसेच महिला कलाकारांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी मदतीचा हात दिला जाणार असल्याचे सुनील महाजन यांनी जाहीर केले.
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून संवाद पुणेतर्फे आनंद पिंपळकर यांच्या सहयोगाने पडद्यामागील कलावंत, नाट्य बुकिंग व्यवस्थापक, पेंटर अशा गरजू कलाकारांना अन्नपूर्णा वस्तूंचे वाटप केले.
ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूकर, अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, प्रणव पिंपळकर, सामाजिक कार्यकर्त्या सोनम पाटील, समीर हंपी, सत्यजित धांडेकर, प्रितम पाटील या वेळी उपस्थित होते.
--
कलाकार-तंत्रज्ञांसाठी निधी उभारणार : तरडे
सध्या कलावंत-तंत्रज्ञांना काम नसल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे. चित्रपट निर्मितीसाठी केल्या जाणाऱ्या खर्चातील काही रक्कम, तसेच चित्रपटाद्वारे मिळालेल्या नफ्यातील काही रक्कमही कलाकार-तंत्रज्ञांच्या मदतीसाठी बाजूला ठेवावी, असा प्रस्ताव चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना दिला असल्याचे अभिनेते प्रवीण तरडे यांनी सांगितले. आगामी चित्रपटाच्या माध्यमातून पाच लाख रुपये मदतीसाठी फंड रूपाने ठेवून या उपक्रमास सुरुवात करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.