पुणे : ‘ओम भट स्वाहा’ म्हणत ‘झपाटलेला’ या चित्रपटातून ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे गुरुवारी संध्याकाळी (४ फेब्रुवारी) राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
राघवेंद्र कडकोळ यांची ‘झपाटलेला’ या चित्रपटातील ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका विशेष गाजली. त्यांनी ‘अश्रूंची झाली फुले’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ यांसारख्या अनेक नाटकांमध्ये चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील ‘धर्माप्पा’ ही भूमिकाही गाजली. कडकोळ यांनी ‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘कुठे शोधू मी तिला’, ‘गौैरी’, ‘सखी’ या मराठी चित्रपटांमध्ये, तर ‘छोडो कल की बाते’ या हिंदी चित्रपटात काम केले आहे. कडकोळ यांनी ‘गोल्ड मेडल’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे. चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल राघवेंद्र कडकोळ यांना नाट्य परिषदेतर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राघवेंद्र कडकोळ यांनी कृष्णधवल चित्रपटांमधून कारकिर्दीला सुरुवात केली. कडकोळ यांना नौदलात भरती व्हायचे होते आणि त्यासाठी त्यांनी परीक्षादेखील दिली होती. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना जहाजावर पाठवण्यात आले. सगळे काही सुरळीत सुरू असताना त्यांची पुन्हा मेडिकल टेस्ट करण्यात आली आणि त्यांच्या कानात दोष असल्याचे कारण देत त्यांना पुन्हा घरी पाठवण्यात आले. कडकोळ यांच्यासाठी हा खूपच मोठा धक्का होता. पण खचून न जाता त्यांनी पुढचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला नाटकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या. ‘करायला गेलो एक’ या नाटकाद्वारे त्यांची अभिनय कारकीर्द सुरू झाली. नाटक सांभाळून ते नोकरी करत. नाटकांच्या दौऱ्यामुळे सतत सुट्ट्या घ्याव्या लागत असल्याने त्यांना नोकरी सोडावी लागली. मोजक्या भूमिकांमधून त्यांनी नाट्य आणि मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.