पुणे : एखादा माणूस नगरसेवक, आमदार, खासदार किंवा मंत्री झाला की, तो कोणत्याही व्यासपीठावर बसण्यासाठी पात्र होतो. खरंतर त्याला संबंधित विषयांची काहीही माहिती नसते, तरी त्याला कशाला वर बसवतात हेच कळत नाही. ही एक राजकीय सोय असावी, अशी खंत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
पहिल्या चित्रपट रसिक महोत्सवाचे आयोजन स.प. महाविद्यालयातील रमाबाई सभागृहात आज करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी दिग्दर्शक मधूर भांडारकर, किरण व्ही. शांताराम, विरेंद्र चित्राव आदी उपस्थित होते. चित्रपट पाहणारे रसिक हे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यांचे संमेलन आजपर्यंत कधीच झाले नाही. ते व्हावे म्हणून हे पहिले रसिक संमेलन होत आहे. पाटील म्हणाले, चित्रपट रसिक तयार करण्यासाठी गावागावात फिल्म सोसायटी जायला हवी. त्यासाठी आम्ही सरकार म्हणून नक्कीच प्रयत्न करू. त्यासाठी सांस्कृतिक विभागाशी बोलणार आहे.
किरण व्ही. शांताराम म्हणाले, फिल्म सोसायटी चळवळीसाठी हा महोत्सव होत आहे. फिल्म सोसायटी कमी आहेत. संपूर्ण भारतात फिल्म सोसायटी चित्रपट कसे बघावे ते सांगतो. दोन वर्षांत दोन लाख मेंबर वाढलेत. चांगले चित्रपट आम्ही सोसायटीकडून दाखवतो. बारामतीला फिल्म सोसायटी आहे. तिथे चांगली चालली आहे. गावामध्ये करायची असेल तर आम्ही करू. फेडरेशनचे मेंबर झाल्यावर आपणास मदत मिळेल.