पुणे : पत्नी मॉडर्न राहत नाही, रंगाने काळी आहे. कुरूप आहे असे म्हणून मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या पतीला न्यायालयाने दणका दिला असून, पत्नीला मासिक ८ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे.
या प्रकरणातील पती-पत्नीचा २०१८ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर काही महिने सगळेजण चांगले राहत होते. त्यानंतर त्यांच्यात किरकोळ गोष्टींवरून वाद सुरु झाले. पत्नी मॉडर्न राहत नाही, म्हणून पतीने पत्नीला त्रास देणे सुरु केले. तरीही काही दिवस पत्नी हे सगळे सहन करीत पतीसोबत राहत होती. मात्र, पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक आणि शारीरिक छळ करू लागला. त्यामुळे पत्नीने अँड. गायत्री कांबळे यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता. तसेच उदरनिवार्हासाठी कोणतेच साधन नसल्याने पोटगी मिळावी, यासाठी अर्ज करण्यात आला होता. पती चांगल्या कंपनीत नोकरी करतो. त्याच्याकडे उत्पन्नाचा स्रोत आहे. तसेच त्याच्यावर घरातील कोणीही अवलंबून नाही. मात्र, माझ्याकडे उदरनिवार्हाचे साधन नसल्याने मासिक २० हजार रुपये पोटगी मिळावी, असा दावा पत्नीने अॅड. गायत्री कांबळे यांच्यामार्फत केला होता. त्यावर पत्नीने केलेले दावे पतीने फेटाळून पत्नी टेलरिंग व ब्यूटी पार्लरचे काम करते असा दावा पतीने केला होता. नोकरीतून मिळणाऱ्या पगारात आईचा वैद्यकीय खर्च आणि इतर घरसामान खरेदी करताना कसरत करावी लागते, असे पतीने म्हटले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा आणि साक्षी, पुराव्यांचा विचार करून पत्नीला दरमहा ८ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे.