पुणे, दि. २२ - फेसबुकवर वादग्रस्त लिखाण करणा-या एका तरूणाचे फेसबुक फ्रेंड असल्याच्या कारणावरून २७ तरूणांना मुंबई सायबर सेलच्या पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. शासनाच्या शेतकरी विरोधी व इतर चुकीच्या धोरणांवर टीका करण्यात आल्याने या नोटीसा पाठविण्यात आल्याचा आरोप नोटीसा मिळालेल्या तरूणांनी केला आहे. पोलिसांनी पाठविलेल्या या नोटीसा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे स्पष्ट करून सोशल मीडियावर याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आहे.
मुंबईच्या सायबर पोलीस ठाण्यात फेसबुकवर देव गायकवाड या नावाने आक्षेपार्ह लिखाण एका तरुणाविरुद्ध विनयभंग, बनावट अकाऊंट उघडून फसवणूक आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याचबरोबर अधिक चौकशीसाठी त्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या तरूणांना सायबर सेलच्या पोलिसांनी नोटीसा पाठविल्या आहेत. पुणे, मुंबई, बीड अशा राज्याच्या विविध भागातील तरूणांना या नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. मानस पगार, आशिष मेटे, ब्रह्मदेव चट्टे, श्रेणीक नरदे, योगेश वागज, सचिन कुंभार, महेंद्र रावले या आणि इतर काही जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या तरूणांना केवळ एका गुन्हयाच्या चौकशीसाठी बोलाविण्यात आले असून त्यांचा केवळ जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे सायबर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी सरदेसाई यांनी सांगितले. त्याचबरोबर मुंबईतील कांजूर मार्ग पोलिसांनी फेसबुक वरच्या लिखाणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने महेंद्र रावले या व्यक्तीला बजावलेली नोटीस सोशल मिडीयावरून व्हाइरल होत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या व विशेषत: सरकारची शेतकरी विरोधी धोरणांना धारेवर धरणा-या या तरुणांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अभिव्यक्त होणा-या तरूणांची अशाप्रकारे मुस्कटदाबी करण्यात आल्याने त्याचा सोशल मिडीयावरून तीव्र निषेध करण्यात येत आहे.सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवी सरदेसाई यांनी सांगितले, ‘‘केवळ एका गुन्हयाच्या चौकशीमध्ये जबाब नोंदविण्यासाठी त्यांना नोटीसा पाठविल्या आहेत. नोटीसांमध्ये त्याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. फेसबुकवर सरकार विरोधात लिखाण करण्याचा या नोटीसांशी काहीही संबंध नाही.’’सरकारची दडपशाहीसोशल मीडियावर अभिव्यक्त होणा-या तरूणांना अशापध्दतीने नोटीसा पाठविणे हा सरकारच्या दडपशाहीचा प्रकार आहे. सरकारच्या धोरणाविरूध्द भुमिका घेणा-या ज्या तरूणांचे फ्रेंड फॉलोअर जास्त असून त्यांच्या लिखाणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे अशाच तरूणांना या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नाझी सरकारच्या गेस्टपो पोलिसांप्रमाणे सायबर पोलिसांनी ही भुमिका वठविली आहे. अशा शब्दात नोटीस बजावण्यात आलेल्या पुण्यातील मानस पगार याने शासनाचा निषेध केला आहे. फेसबुकवर देव गायकवाड या नावाने बनावट अकाऊंट उघडून एका तरूणाने अत्यंत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी त्याने आक्षेपार्ह भाषा वापरलेली आहे. त्यामुळे त्याच्याविरूध्द बनावट बनावट अकाऊंट उघडण्यासह विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी काही जणांना साक्षीदार म्हणून चौकशी साठी बोलवण्यात आले आहे. त्या पैकी ब्रह्मा चट्टे यांचा जबाब आज नोंदवण्यात आला असून त्यांना कोणत्याही प्रकारे ताब्यात घेण्यात आलेले नाही. काही जण या बाबत खोटी माहिती सोशल मीडिया वर पसरवत आहेत.कृपया अशा माहिती वर विश्वास ठेवू नका. या बाबत मुबई पोलिस दला कडून अधिकृत माहिती घ्यावी, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्यांनी केले आहे.