कात्रज: अभिजित डुंगरवाल
मागील एक महिन्यापासून कात्रज भागातील राजस चौकात भोळसर असलेली एक महिला राहत आहे. दोन दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये या महिलेला जेवण तर सोडाच पाणीदेखील मिळाले नाही. मात्र कात्रजमधील दोन युवकांनी तिच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली.
स्वत:चे नाम सुशीला माने अशी सांगणारी ही वयोवृद्ध महिला कात्रज येथील राजस चौकात अनेक दिवसापासून राहते. राजस चौकातील हॉटेलमध्ये येणारे लोक तिला खायला व पिण्याचे पाणी देतात. मात्र दोन दिवसांच्या या लाॅकडाऊनमुळे हॉटेल ही उघडले नाही किंवा तिला मदत करणारे नागरिकदेखील दिसले नाहीत. कात्रज भागातील ऋषीकेश कामठे व तृनाल भरगुडे या दोन युवकांनी हे दृश्य पाहिले व या महिलेला अन्न व पाण्याची व्यवस्था केली. त्यांनी अन्न देताच ही महिला अक्षरश: अन्नावर तुटून पडली.
या युवकांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये अशा अनेक नागरिकांचा आम्ही शोध घेतला व त्यांना अन्न दिले. पोलीस अडवतील ही भीती वाटत होती. पण तशी वेळ आली नाही. आम्ही या महिलेची चौकशी केली असता, तिने सांगितले की, मला गुलटेकडी येथून कचरा टाकणाऱ्या एका माणसाने या ठिकाणी आणून सोडले. मी एका बाईकडे बंगल्यात काम करत होते. माझे केसदेखील या कचरा टाकणाऱ्या माणसाने कापले,’’ असे त्या महिलेने युवकांना सांगितले. सोमवारी या महिलेला संबंधित ठिकाणी पाठविण्यात येणार आहे.