पुणे : केवळ तृतीयपंथी आहे म्हणून प्रवेश नाकारण्याची घटना पुण्यातील फीनिक्स मॉलमध्ये घडली आहे.आत कार्यक्रमासाठी आले आहे असं वारंवार सांगूनही सुरक्षा रक्षकांनी सोडले गेले नसल्याचा अनुभव उच्चशिक्षित तृतीयपंथी सोनाली यांना आला. मित्रासह गुढीपाडव्यानिमित्त खरेदीसाठी गेलेल्या सोनाली यांना सुरक्षारक्षकांनी मॉलमध्ये प्रवेश नाकारला. यापूर्वी येथे येवून गेल्याचे वारंवार सांगूनही त्यांना आतमध्ये सोडण्यात आले नाही. त्यांच्यासोबत असलेल्या काही व्यक्तींनी या घटनेचे चित्रण करून सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे संबंधित प्रकार उघड झाला. दरम्यान सोनाली दळवी यांनी एमबीए फायनान्सपर्यंत शिक्षण घेतले असून त्या आशीर्वाद सामाजिक संस्थेसाठी काम करता.
याविषयी सोनाली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे सांगितले. मी तिथून निघून जाण्याचा पर्यायही स्वीकारू शकले असते परंतु तिथे थांबून त्यांच्या मानसिकते विरोधात लढा देणे महत्वाचे वाटले. मी इतक्यावर थांबणार नसून या प्रकरणी कायदेशीर लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत फिनिक्स प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांनी यापूर्वी तृतीयपंथ्याकडून आलेल्या अनुभवामुळे प्रवेश नाकारण्यात आल्याचे सांगितले.सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेश नाकारण्यात आला असून त्यांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता अशी सारवासारव व्यवस्थापक सी.पी.पोरवाल यांनी केली.