लोकमत न्यूज नेटवर्कराजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागतील खानवटे येथील नदीपात्रात रात्रीच्या सुमारे १५-२0 फायबर बोटी आणि सेक्शन बोटीने बेकायदा वाळू उपशाने थैमान घातले आहे. येथील नदीपात्रावरील अत्यंत महत्त्वाचा असा मुंबई -हैदराबाद रेल्वे पुलाच्या जवळच पायथ्याला वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे या पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे.दरम्यान, दोन वर्षांपूर्वी येथील भूखंडाचा शासकीय लिलाव झालेला होता. मात्र, याच वाळू उपशावरून भिगवण येथील एका युवकाला आपल्या प्राणाशी मुकावे लागले होते. सध्या याच ठिकाणी वाळू उपशावरून ग्रामस्थ आणि वाळूतस्कर यांच्यात वारंवार वाद होत आहेत. भविष्यात येथे मागील घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.अहोरात्र वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केल्याने गावातील रस्ते देखील डबघाईला आलेले आहेत. तसेच नदी पत्रातून शेतकऱ्यांनी शेतीसाठी जलवाहिन्या नेलेल्या आहेत त्या देखील ठिकठिकाणी फुटल्या आहे. मात्र हे वाळू तस्कर कोणालाही न जुमानता वाळूची चोरी मोठ्या प्रमाणावर करत आहे गावातील नागरिकांनाही दमदाटी देत आहेत. येथील वाळू चोरी विषय येथील नागरिकांनी वारंवार प्रशासनाला याची जाणीव करूनदेखील प्रशासन याकडे डोळेझाक का करीत आहे? येथील बेकायदेशीर वाळू वाहतूक बंद करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी येथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.येथील रेल्वे पुलाच्या पायथ्याला वाळू उपसा केल्याने पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या ठिकाणी अशीच वाळू चोरी राहिली तर पूल कोसळल्याशिवाय राहणार नाही, असे येथील जाणकार मंडळींकडून बोलले जात आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. या व्यवसायातून कमी वेळात अधिक पैसे मिळत असल्याने या वाळूचोरांची मुजोरी वाढत आहे. गावातील नागरिकांना कोणालाच ते जुमानत नाहीत.
बेलगाम वाळूचोरांचा धुमाकूळ
By admin | Published: May 25, 2017 2:57 AM