वारजे : शिवणेत झालेल्या प्रद्युम्न कांबळे खून प्रकरणी त्याच्या प्रेयसी असलेल्या प्राजक्ता पायगुडे हिला देखील कट रचल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे एकूण अटक आरोपींची संख्या आता आता पाच झाली आहे.
सोळा मार्चला दांगट पाटील नगर मध्ये प्राजक्ता हीच्या आई, वडील, भाऊ व त्याचा मित्र अश्या चौघांनी मिळून धारदार शस्त्र, सिमेंटचे गट्टू, व लोखंडी रॉड ने केलेल्या मारहाणीत कांबळे याचा मृत्यू झाला होता. तपास दरम्यान या कारस्थानात प्राजक्ता हिचा देखील समावेश असल्याचा खुलासा झाल्याने तिला ही आरोपी करत पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अँट्रॉसिटी कलम देखील लावण्यात आले असून अधिक तपास पोलीस सहायक आयुक्त रुक्मिणी गलांडे करीत आहेत.
आरोपी प्राजक्ता व मयत प्रद्युम्न यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यास तिच्या घरच्यांचा विरोध होता. तो त्यादिवशी प्राजक्ताला भेटायला तिच्या घरी आला होता. संध्याकाळी तिचे पालक व भाऊ आल्यावर त्यांनी प्रद्युम्न घरी आल्याचा राग आला म्हणून रागाच्या भरात आधी घरात व नंतर त्याने पळण्याचा प्रयत्न केल्यावर इमारतीच्या बाहेर रस्त्यावर त्याला बेदम मारहाण केली. पोलिसांनी त्यास जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान मृत्यू पूर्वी मयत प्रद्युम्नचे डोळे काढून व त्याच्या गुप्तांगाला इजा करून अनन्वित छळ करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली. व या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या पोस्टमार्टेम मध्ये काहीच आढळून आले नसल्याचे सांगितले.
प्राजक्ताचा आत्महत्येचा प्रयत्न
या प्रकरणी धक्का बसल्याने प्राजक्ता हिने देखील लगेच स्वतःला घरात कोंडून घेत ओढणी ने गळफास घेण्याचा व नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती लोकांनी दिली. पोलिसांनी लगेच दार तोडून घरात प्रवेश करून तिला रोखल्याने पुढील अनर्थ टळला.