पुणे/किरण शिंदे : उपचारासाठी आणलेल्या लाडक्या मांजराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने एका महिलेसह पाच जणांनी क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरला बेदम मारहाण केली. हडपसर परिसरातील डॉग अँड कॅट क्लिनिकमध्ये 10 डिसेंबरच्या रात्री हा प्रकार घडला. डॉ. रामनाथ येण्याबापू ढगे (वय 51) यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून एका महिलेसह चार अनोळखी इसमाविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपींनी फिर्यादी यांच्या भाजी मंडई जवळील डॉग अँड कॅट क्लिनिकमध्ये उपचारासाठी मांजराला आणले होते. यावेळी उपचार सुरू असताना मांजराचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी 'मांजर कसे झोपले, आता तुला झोपवतो, तुझा दवाखाना बंद करतो" अशी धमकी दिली. फिर्यादी यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या उजव्या पायाच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या क्लिनिक मधील वस्तूंची देखील तोडफोड केली आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.