पुणे : सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बहिणींना पैसे मिळाले, मात्र त्यांचे अर्ज लिहून देणाऱ्या अंगणवाडी ताईंना त्यासाठी अजून एक पैसाही मिळालेला नाही. त्या सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत का? असा प्रश्न अंगणवाडी सेविका संघटनांकडून विचारला जात आहे.
या योजनेसाठी लाभार्थी महिलांना अर्ज लिहून देण्यात सर्वात मोठी भूमिका अंगणवाडी सेविकांची होती. सरकारनेच तसे जाहीर केले होते. त्याचबरोबर प्रत्येक लाभार्थी महिलेसाठी अंगणवाडी सेविकेला ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. याशिवाय लाभार्थी महिलांना या योजनेतंर्गत होणाऱ्या जिल्हा मेळाव्याला आणण्याची जबाबदारीही अंगणवाडी सेविकांवरच सोपवण्यात आली होती.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांनी आपले रोजचे काम सांभाळून ही अतिरिक्त जबाबदारीही पार पाडली. त्यानंतर अंगणवाडी सेविकांना प्रती लाभार्थी महिला ५० रुपये याप्रमाणे सरकारने पैसे अदा करणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र अद्याप एकाही अंगणवाडी सेविकेला हे पैसे मिळालेले नाहीत असे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले. त्याची विचारणा कुठे करायची, हे पैसे कसे मिळणार याविषयी या अंगणवाडी सेविकांना प्रशासकीय यंत्रणेकडून कसलीही माहिती दिली जात नाही.
अत्यंत कमी मानधनावर ग्रामीण भागात हजारो महिला अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. अंगणवाडी केंद्रात ० ते ६ वर्ष वयोगटातील बालके, गर्भवती व स्तनदा माता यांना पूरक पोषण आहार, पूर्व शालेय शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि पोषण व आरोग्य विषय शिक्षण या आरोग्य विषयक सेवांची माहिती अशा सर्व प्रकारची कामे त्यांना करावी लागतात. यातील बहुसंख्य सेविका एकल, विधवा, परितक्त्या आहेत. त्यांना सरकारने त्वरित त्यांच्या कामाचे हक्काचे पैसे वितरित करावेत, अशी मागणी शिंदे यांनी केली.