गेल्या महिन्यात झिका विषाणूजन्य आजाराचा एक रुग्ण बेलसर येथे आढळून आला होता. या आजाराचा रुग्ण आढळल्याने वैद्यकीय क्षेत्राबरोबरच पुरंदर तालुक्यात मोठी खळबळ माजली होती. हा नेमका आजार काय आहे, हे समजल्याने बेलसर व परिसरात मोठी घबराट निर्माण झाली होती. रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि त्यानंतर केंद्रीय आरोग्य पथकाने बेलसर गावाला भेट दिली होती. केंद्रीय पथकाच्या सूचनांनुसार बेलसर आणि ५ किमी त्रिजेच्या परिसरातील पारगाव, कोथळे, खानवडी, वाळुंज निळुंज या गावातून १५ आरोग्य पथकांद्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत या सर्व गावांतील एकूण १० हजार ५८७ लोकसंख्येचे तीन वेळा सर्वेक्षण करण्यात आले आहे. आता चोथ्यांदा सर्वेक्षण सुरू आहे.
बेलसर मध्ये रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायतीने संपूर्ण गाव आणि वाड्यावस्त्यांवर धुरळणी, फॉगिंग केले आहे. तणनाशक फवारणीही करण्यात आली आहे. पाणी साठवून ठेवू नये म्हणून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याच्या टाक्यातून डास अळ्या होऊ नयेत म्हणून औषध व गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. गरोदर महिलांना विशेष काळजी घ्यावी म्हणून मच्छरदाणी वाटप करण्यात आली आहे. तसेच घर व परिसर स्वच्छ ठेवावा म्हणून ग्रामस्थांना आवाहन करण्यात येत आहे, अशी माहिती बेलसरचे उपसरपंच धीरज जगताप यांनी दिली .
प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फतही सर्वेक्षणाबरोबरच नागरिकांत जनजागृती करण्यात येत आहे. बेलसर व परिसरातील केलेल्या गावांतून झिका विषाणूजन्य आजाराचा रुग्ण आढळला नाही. मात्र गेल्या महिनाभरात ७ रुग्ण डेंग्यू, ८५ चिकूनगुण्या, आणि २६ डेंग्यू आणि चिकूनगुण्याचे रुग्ण आढळले होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज मात्र या परिसरात एकही तापाचा रुग्ण नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भरत शितोळे यांनी सांगितले.
झिका विषाणूजन्य आजाराचा मोठा धोका गरोदर मातांना असतो म्हणून आरोग्य विभागाने त्यांचेही सर्वेक्षण केले आहे. या सहा गावातून एकूण २४ गरोदर माता आहेत. सातत्याने त्यांच्याशी आरोग्य कर्मचारी संपर्क ठेवून आहेत. त्याचबरोबर जननक्षम ३८६ जोडपी आहेत. या सर्वांशी संपर्क ठेवला जात आहे. गर्भधारणा होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय सुचवण्यात येत आहेत. त्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम आदींची सोय आरोग्य केंद्रात करण्यात आलेली आहे. असे ही त्यांनी सांगितले.