पुणे : कोरोना उपचारांनंतरचे औषधांचे परिणाम आणि मानसिक तणाव यावर नैसर्गिक उपचार आणि योगासने प्रभावी ठरू शकतात. रुग्ण, नातेवाईक यांना मानसिक सकारात्मकतेची आवश्यकता असून ही सकारात्मकता योगसाधनेने सहज मिळेल, असे प्रतिपादन योगगुरू बाबा रामदेव यांनी केले. पुणे महापालिका आणि पतंजली योग्य समितीच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन योगशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या संकटकाळात पुणेकरांची योगसेवा करण्याची संधी मिळणे, हे माझे भाग्य असल्याचे बाबा रामदेव या वेळी म्हणाले.
या उपक्रमाद्वारे गृह विलगीकरणात असलेले, बरे झालेले कोरोनाबाधित तसेच सर्वच पुणेकरांसाठी योग प्राणायाम आणि आयुर्वेदिक व घरगुती औषधांचे मोफत ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या शिबिराचे उद्घाटन बाबा रामदेव यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. महापौर मुरलीधर मोहोळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक आणि योगसमिती प्रतिनिधी महापौर कार्यालयातून उपस्थित होते. बाबा रामदेव म्हणाले, कोरोनाकाळात लोकांच्या मनात खूप भीती निर्माण झाली आहे. लोक कोरोनाच्या भीतीने प्राण गमवत आहेत. औषधांचा होणारा अधिकचा मारा हानिकारक आहे. लोकांना मानसिक त्रास आणि तणावामुळे झोप येत नाही. योगामुळे नैसर्गिक ताकद जास्त प्रमाणात मिळू शकते. स्वास्थ्य चांगले आणि उत्तम होऊ शकते.
महापौर मोहोळ म्हणाले, मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी योगसाधना करण्याची गरज आहे. या अभियानामार्फत पुणेकरांना एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. योग शिबिरामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी फायदा होणार आहे. लोकांमधील भीती कमी होण्यास आणि त्यांचे मनोबल चांगले ठेवण्यास मदत होणार आहे.
------
या लिंकवरून होऊ शकता जॉईन
गुगल मिट लिंक : meet.google.com/ctq-awcu-xar
फेसबुक लिंक : https://www.facebook.com/PMCPune
---
शिबिराची वेळ
दररोज सकाळी ७ ते ८
सायंकाळी ५ ते ६
--
संध्याकाळी ६ ते ७.३० या वेळेत २५ योग आणि आयुर्वेद तज्ज्ञ फोनद्वारे नागरिकांच्या शंकांचे समाधान करणार आहेत.