रांजणगाव सांडस : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे व परिसरातील, सादल गाव बंधारे हे कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे शिरुर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात पाणीसाठा कमी झाला होता. शेतकरी वर्गात शेतीला पाणी पुरेल का, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. गेल्या आठवड्यात भामा-आसखेड धरणामधून भीमा नदीला पाणी सोडल्यामुळे आलेगाव पागा, आरंगाव, वडगाव बाढे या भागातील बंधाºयाला पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यंदाची दिवाळी या पाण्यामुळे गोड झाली आहे. यामुळे बंधाºयाच्या शेवटच्या पात्रातदेखील पाणी वाढल्याने सादल गाव, वडगाव रासाई, मांडवगण फराटे, आलेगाव पागा, राक्षे वाडी, नागरगाव, रांजणगाव सांडस परिसरातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्हा व इतर सर्व जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा लवकरच दुष्काळ जाणवायला लागला होता. आलेगाव पागाचा बंधारा हा ऐन हिवाळ्यात कोरडा पडल्याने अडचणी उद्भवल्या होत्या. जिरायती भागाप्रमाणेच बागायती भागातही समस्या निर्माण झाली होती. यंदाच्या वर्षी प्रथमच आॅक्टोबर महिन्यात भीमा नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली होती. गेल्या आठवड्यात सोडलेल्या पाण्यामुळे नदीपात्र भरत आहे.