पिंपरी : ‘‘मी आता मंत्री नसल्याने रिकामाच आहे. त्यामुळे पक्षसंघटन आणि पिंपरी-चिंचवड याकडेच आता अधिक लक्ष देणार आहे. आगामी काळात शहरात पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रकल्पांना महत्त्व द्यावे लागणार आहे. त्या दृष्टीने बीआरटी प्रकल्पाचे किमान दोन मार्ग मार्चपर्यंत सुरू करण्याचा मानस आहे,’’ असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने ते शहर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी आकुर्डीतील हॉटेलमध्ये पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक घेतली. बैठकीस महापौर शकुंतला धराडे , उपमहापौर प्रभाकर वाघेरे, आझम पानसरे, शहराध्यक्ष योगेश बहल, पक्षनेत्या मंगला कदम, माजी उपमहापौर शरद मिसाळ, डब्बू आसवानी, जगदीश शेट्टी, उल्हास शेट्टी, दत्ता साने, नाना काटे आदी उपस्थित होते. अर्थसंकल्पानंतर चित्र स्पष्ट होईल, कोणत्या विकासकामांना प्राधान्य द्यायचे हे निश्चित होईल. पंतप्रधान मोदी यांची लाट होती. त्यामुुळे लोकसभा, विधानसभेत त्यांना यश मिळाले, असे म्हटले जाते. कोणतीच लाट कधीच कायम टिकत नाही, हे गेल्या ३० वर्षांच्या राजकारणात अनुभवले आहे. अपेक्षांची पूर्ती झाली नाही, तर लोक पाठ फिरवतात. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी धार्मिक कट्टरवादापासून अलिप्त राहण्याचा सल्ला दिला. हे आत्मचिंतन करायला लावणारे असल्याचे भाजपने लक्षात घ्यावे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खात्यात यापूर्वीच्या मंत्र्यांच्या काळात अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे.आता सरकार त्यांचे आहे, आरोप कशाला करायचे, कारवाई करून दाखवावी, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले. (प्रतिनिधी)
बीरआरटी मार्चपर्यंत सुरू करणार
By admin | Published: January 30, 2015 3:36 AM