पुणे : पुणे महापालिका हद्दीबाहेरील अंध व्यक्तींनाही आता पीएमपीएमएलच्या प्रवासी पासचा लाभ मिळणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांना २५ टक्के शुल्क भरावे लागणार असून, उर्वरीत ७५ टक्के रक्कम महापालिका भरणार आहे. याबाबतच्या प्रस्तावास महिला आणि बालकल्याण समितीने मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव मंगळवारी (दि.२८) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीसाठी ठेवण्यात आला आहे. हा पास पीएमपी हद्दीबाहेर जिथपर्यंत बस जाते, तिथपर्यंत असणार असल्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या माध्यमातून शहरातील अपंग व्यक्तींना पास दिले जात होते. तर पीएमपीकडून अंध व्यक्तींना पास दिले जात होते. या दोन्ही पासची रक्कम महापालिकेकडून कोणतीही चौकशी न करता अथवा किती पास दिले, याची माहिती न घेताच दिले जात होते. पीएमपीकडून मागणी करण्यात येईल तेवढी रक्कम देण्यात येत होती. मात्र, ही अनेक सदस्यांकडून नेमके किती पास पीएमपी देते याची माहिती मागण्यात आली होती. पण, पीएमपीकडून सरसकट पास दिले जात असल्याने हा आकडा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या वर्षीपासून नागरवस्ती विभागाने अपंग तसेच अंधांचा पास याच विभागाने देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण समितीने या प्रस्तावास मान्यता दिली असल्याचे समितीच्या अध्यक्षा अर्चना कांबळे यांनी सांगितले.पालिका हद्दीतील अंध, अपंग, गतिमंद व्यक्तींना पीएमपीएमएलकडून मोफत पास दिला जातो. ही पासची रक्कम महापालिकेच्या वतीने दर वर्षी पीएमपीला दिली जाते. चालू वर्षात शहरातील अंध, अपंग व्यक्तींची संख्या ५२० इतकी असण्याची शक्यता पीएमपीएमएलने महापालिकेला कळविली होती. तर दृष्टिहीन संघाने पालिका आयुक्तांकडे केलेल्या मागणीनुसार हद्दीबाहेर राहत असलेल्या अंध व्यक्तींची संख्या सर्वसाधारण २०० असल्याने त्यासाठी प्रत्येक महिना १,२०० रुपये याप्रमाणे २८ लाख ८० हजार रुपये खर्च येणार असल्याचे या प्रस्तावात नमूद केले आहे.
पालिका हद्दीबाहेरील अंधानाही बसपास
By admin | Published: July 25, 2015 11:53 PM