शिरुर : राज्यातील चाैथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय. राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद हाेणार आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरुर या दाेन मतदारसंघामध्ये आज मतदान हाेत आहे. तरुणांचा या भागात उत्साह कमी असला तरी ज्येष्ठ नागरिक आवर्जुन आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर येत आहेत. शिरुर मतदारसंघातील भाेसरी येथील मतदान केंद्रावर आनंदीबाई साळवी या 75 वर्षांच्या आजींनी मतदान केले. विशेष म्हणजे आठवड्यापूर्वी रिक्षा उलटून त्यांचा अपघात झाला हाेता. या अपघातात त्यांचा हात तुटला हाेता. तर त्यांच्या कुटुंबातील सगळेचजण जखमी झाले हाेते. असे असताना या आजींसह सर्वच कुटुंबानी आपलं कर्तव्य बजावण्यासाठी मतदान केंद्रावर हजेरी लावली. लाेकशाहीसाठी, पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान केले पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी लाेकमतकडे व्यक्त केली.
23 एप्रिल राेजी पुणे आणि बारामती लाेकसभा मतदार संघामध्ये मतदान पार पडले हाेते. पुण्यात अवघे 49 टक्के मतदान झाले हाेते. तर बारामती मध्ये 63 टक्के मतदान झाले हाेते. पुण्याचा मतदानाचा टक्का यंदा कमालीचा घसरला हाेता. लाेक मतदान करण्यासाठी बाहेर पडलेच नाही. सकाळच्यावेळी नागरिकांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली असली तरी दुपारनंतर फारसे लाेक मतदान केंद्रांवर फिरकले नाहीत. आज शिरुर आणि मावळ या दाेन लाेकसभा मतदार संघासाठी मतदान पार पडतंय. भाेसरीतील एका मतदान केंद्रावर साळवी कुटुंब मतदानासाठी आलं हाेतं. या कुटुंबाचा आठवडाभरापूर्वी अपघात झाला हाेता. रिक्षा उलटल्यामुळे या कुटुंबातील सर्वच जण जखमी झाले हाेते. यात आनंदीबाई साळवी या 75 वर्षीय आजी देखील जखमी झाल्या हाेत्या. त्यांचा हात या अपघातात फॅक्चर झाला हाेता. असे असताना त्या आज आवर्जुन मतदानासाठी आल्या हाेत्या. त्यांना चालणे देखील शक्य नव्हते. असे असताना मतदानाचे कर्तव्य चुकवायचे नाही हा विचार मनात ठेवून त्यांनी मतदान केंद्र गाठले.
लाेकमतशी बाेलताना साळवी आजी म्हणाल्या, लाेकशाही साठी मतदान करणं आवश्यक आहे. माझ्या मुलांच्या, नातवंडांच्या उज्वल भविष्यासाठी मी मतदान करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी आज मतदान करण्यासाठी आले आहे. एकिकडे ज्येष्ठ नागरिक आवर्जुन आपला मतदानाचा हक्क बजावत असले तरी दुसरीकडे तरुणांमध्ये उत्साह फारसा दिसून आला नाही. दुपारी एक वाजेपर्यंत शिरुरमध्ये 23.92 टक्के मतदान झाले हाेते. शिरुरमध्ये माेठी लढत हाेत असून राष्ट्रवादीकडून डाॅ. अमाेल काेल्हे निवडणुक लढवत आहेत, तर शिवसेनेचे आढळराव पाटील रिंगणात आहेत.