पुणे : कथित माओवादी प्रकरणात अटक केलेल्या सुधीर ढवळे यांच्या व्यतिरिक्त इतर 11 जणांना कधी पाहिलं सुद्धा नाही. त्यामुळे त्यांच्याकडून एल्गार परिषदेसाठी पैसे घेण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांना गाेवण्यात आले असून सध्या आणीबाणी पेक्षा माेठी अघाेषित महाआणीबाणी असल्याचा आराेप माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांनी केला. तसेच माओवादी प्रकरणात सहा हजार पानांच्या आराेपपत्रातून काहीही सिद्ध हाेणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कथित माओवादी प्रकरणात डाॅ. आनंद तेलतुंबडे यांनाही आराेपी करण्यात आल्याने तेलतुंबडेंना पाठींबा देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. काेळसे पाटील म्हणाले, एल्गार परिषद मी आणि माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी आयाेजित केली हाेती. एल्गार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील एम आय टी महाविद्यालयाचा शनिवारवाड्यावर कार्यक्रम हाेणार हाेता. त्यामुळे त्यांनी 31 तारखेला मंच उभारु देण्याची विनंती केली हाेती. तसेच त्यांची ताे मंच एल्गार परिषदेसाठी वापरण्यास हरकत नव्हती. त्यामुळे एल्गार परिषद ही एमआयटीने उभारलेल्या मंचावर झाली. त्यासाठी आम्ही काेणाकडूनही पैसे घेतले नाहीत. तसेच कथित माओवादी प्रकरणात अटक केलेल्यांचा एल्गार परिषदेशी कुठलाही संबंध नाही. सुधीर ढवळे यांच्याव्यतिरिक्त काेणाला आम्ही अद्याप पाहिलं सुद्धा नाही. पाेलिसांनी यापूर्वीच एल्गार परिषदेचा भीमा काेरेगाव दंगलीशी संबंध नसल्याचे जाहीर केले आहे. इतर 11 जणांप्रमाणेच आनंद तेलतुंबडेंना कायदेशीर मदत आम्ही पुरवणार आहाेत.
माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचा जबाब न नाेंदवताच त्यांचा जबाब नाेंदविल्याचे पाेलिसांनी काेर्टात सांगितले. असा आराेपही काेळसे पाटील यांनी यावेळी केला. खाेटे पुरावे सादर करुन विराेधकांना नेस्तनाबूत करण्याचा हा गुजरातमधील प्रयाेगशाळेतील प्रयाेग असल्याची टीकाही त्यांनी केली. सहा हजार पानी चार्जशीट मधून काहीही सिद्ध हाेणार नाही, सरकार यांना निवडणूका हाेईपर्यंत तुरुंगात ठेवेल असेही काेळसे पाटील यावेळी म्हणाले.