लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील विविध महाविद्यालयातील कला विद्यार्थ्यांसाठी महिन्यातून एखादा कार्यक्रम महापालिकेने घ्यायला हवा तसेच पालिकेने नृत्य संकुल उभे करून पालिकेच्या शाळांमध्ये मुलींना शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण देण्यात यावे, अशा अपेक्षा सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंतांनी महापौरांकडे व्यक्त केल्या. त्यावर पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि वाढविण्यासाठी महापालिका कलाकारांना सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन देत कलाकारांनीही संवादासाठी एकत्र यावे, असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
पुणे शहराच्या विकासाच्या चर्चेत वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांचे सक्रिय योगदान असावे या भावनेने स्थापन झालेल्या ‘क्लब ऑफ इन्सपायरर पुणे’ (सीओआयपी) मध्ये सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांशी महापौरांनी संवाद साधला. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळिक उपस्थित होते.
ज्येष्ठ तबलावादक पं. विजय घाटे, ज्येष्ठ नृत्यगुरू मनीषा साठे, गायक राहुल देशपांडे, लेखक प्रसाद शिरगावकर, मिलिंद कुलकर्णी, आदित्य जोशी, तेजस्विनी साठे आदींनी सांस्कृतिक क्षेत्राच्या अपेक्षा मांडल्या. पं. घाटे म्हणाले की, कोविडमुळे आजही सांस्कृतिक क्षेत्र पूर्ववत सुरू झालेले नाही. कलाकारांना जागा आणि प्रायोजकत्व मिळवण्यासाठी अनेक समस्या येतात, उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही या प्रश्नांवर महापालिकेने कलाकारांना मदत करायला हवी.
“पालिकेने नृत्य संकुल उभे करून पालिका शाळांमध्ये मुलींना शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण द्यावे,” अशी संकल्पना साठे यांनी मांडली. राहुल देशपांडे यांनी छोट्या आकाराच्या प्रेक्षागृहांची गरज व्यक्त केली. प्रसाद शिरगावकर यांनी कलाकारांसाठीच्या सार्वजनिक कट्ट्यांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासामुळे पुण्याला अत्याधुनिक दर्जाचे नवे सांस्कृतिक दालन खुले होणार असल्याचे महापौर म्हणाले. रासने यांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकात कला अकादमीमध्ये गायन, नृत्य, प्रायोगिक नाटक यासाठी पूरक प्रेक्षागृहे, प्रशिक्षण केंद्र करणार असल्याचे सांगितले.
.....