पुणे : गेल्या काही वर्षांपासून भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये ‘क्राऊड फंडिंग’चा वेगळा मार्ग निर्माते, दिग्दर्शकांकडून निवडला जात आहे. आपले विचार, कल्पना दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्या-बरोबरच चित्रपटांकरिता फंड उभा करण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरत आहे. या फंडिंगचे स्वरूप देणगी किंवा सामाजिक उपक्रमाचा भाग नसून, कला आणि चित्रपटांना सपोर्ट करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे मत अंशुलिका दुबे यांनी व्यक्त केले. १४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अंशुलिका दुबे यांचे ‘क्राऊड फंडिंग’ विषयावर व्याख्यान झाले. यावेळी ‘क्राऊड फंडिंग’ म्हणजे काय? त्याचे स्वरूप कसे असते? त्यामागचा उद्देश काय? याबद्दल त्यांनी माहिती दिली. दुबे म्हणाल्या, ‘‘बऱ्याचदा असे होते की डोक्यात एखादा विषय तयार असतो आणि त्यावर चित्रपट निर्मित व्हावा, अशी इच्छा असते, पण चित्रपटासाठी निधी कसा उभा करायचा, हा प्रश्न आपल्यासमोर येतो. कला आणि संस्कृतीसाठी पुढाकार घेऊन सहकार्य करण्याची अनेकांची इच्छा असते मात्र त्यांना मदत कुठे आणि कशी करायची? याची माहिती नसते. तुम्हाला एखादी गोष्ट निर्मिती करायची आहे मग शॉर्ट फिल्म किंवा चित्रपट असो ती संकल्पना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पहिल्यांदा फेसबुक पेजवर त्याचे व्हिक्युअल क्लिपिंग लोड करावे लागते. लोकांना ती कल्पना आवडल्यावर यासाठी फंडिंग देण्याचे आवाहन केले जाते. जे लोक फंडिंग देतील त्यांना काहीतरी फायदा होणे आवश्यक आहे मग त्यातील कॅटॅगरीनुसार चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगबरोबरच त्यांना चित्रपटाच्या प्रीमिअरला बोलावणे या गोष्टी करता येणे शक्य आहे.’’ (प्रतिनिधी)
चित्रपटनिर्मितीसाठी ‘क्राऊड फंडिंग’ उत्तम पर्याय
By admin | Published: January 20, 2016 1:27 AM