पुणे :पानशेत, सिंहगड, ताम्हिणी घाट, मुळशी अशा काहीशा जुन्या झालेल्या ठिकाणी जायचा कंटाळा आला असेल तर शिरूर जवळच्या रांजणखळग्यांचा पर्याय तुमच्यासाठी खुला आहे. पुण्यापासून अवघ्या दोन तासात जाता येईल अशा वाघोली, शिरूरमार्गे टाकळीहाजी गावाच्या नदीत नैसर्गिक रांजणखळग्यांची किमया तुम्हाला बघायला मिळेल. नगर, पारनेर,निघोजमार्गेही जाण्याचा पर्याय आहे.
काय आहेत रांजणखळगे ?कुकडी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने नदीच्या पात्रात निर्माण झालेले विविध आकारांचे खड्डे म्हणजे रांजणखळगे. ही निसर्गाची किमया बघण्यासाठी जगभरातून पर्यटकांची इथे गर्दी असते. पुण्यापासून तर एक दिवस कुटुंबासह ही सहल करता येईल.कुकडी नदी पात्रात २०० मी लांब व ६० मी. रुंद इतक्या भागात खडकामध्ये रांजणखळग्यांचे विविध आकार पहायला मिळतात. या रांजण खळग्याना स्थानिक भाषेत ‘कुंड’ म्हणतात.
जवळपास भटकंतीचे पर्याय ?रांजणखळग्यांच्या व्यतिरिक्त नदीच्या काठावर ग्रामदेवता मळगंगा देवीचे मंदिर आहे. तिथे दर्शन घेतल्यावर झुलत्या पुलावरून रांजणखळगे बघता येतात. शिवाय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी गावही तिथून जवळ आहे.वेळ असेल तिथेही चक्कर मारता येईल. मोरांसाठी प्रसिद्ध असलेले मोराची चिंचोली गावही वाटेत असून तिथेही भेट देता येईल.रांजणगाव गणपतीही जवळ असून त्याचेही दर्शन घेता येईल.
जेवणाची सोय ?जेवणासाठी हॉटेल मात्र या गावात नाही. मात्र दोन तास आधी सांगितलं तर ताज जेवण बनवून दिले जाते. तसे काही बोर्डही रस्त्यात बघायला मिळतात. शिवाय जवळच असलेल्या शिरूरला जेवणासह मुक्कामाचीही उत्तम सोय आहे.