पुणे : आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या कामगाराने कंपनीलाच १३ लाख ३१ हजार रुपये ऑनलाइन आणि रोकड स्वरूपात काही रक्कम असा दोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुप्रिया अविनाश संकपाळ (३७, रा. चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदननगरपोलिसांनी संदेश संजय तरटे (रा. आव्हाळवाडी) याच्याविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ एप्रिल २०१६ ते ३० ऑगस्ट २०२० या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संकपाळ यांची सुरक्षारक्षक पुरवणारी कंपनी आहे. तर आरोपी तरटे हा त्यांच्या कंपनीत कामगारांचे पगार करण्यापासून सर्व आर्थिक व्यवहार सांभाळण्याचे काम करत होता. राघवेंद्रनगर खराडी येथील पद्मछाया सोसायटीत कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. तरटे याने फिर्यादी आणि त्यांच्या कंपनीचा विश्वासघात करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीच्या खात्यातून १३ लाख ३१ हजार ११२ रुपये ऑनलाइन स्वरूपात स्वतःच्या आणि नातेवाइकांच्या खात्यात पाठवले. तसेच रोख स्वरूपात काही रक्कम अशी दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक तरटे याने केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तरटे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.