पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील ऑर्डर पोहचविण्यासाठी दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन १७ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गेली १५ वर्षांपासून काम करणाऱ्या नोकरानेच विश्वासघात केला आहे.
फरासखाना पोलिसांनी सुकुर वहानअली सुलतान साहा (वय ३५, रा. पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कायेम कासिम शेख (वय ४६, रा.नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. शेख यांचे रविवार पेठेत शेख ब्रदर्स गोल्ड स्मिथ हे दुकान आहे. शेख हे मुळचे पश्चिम बंगालमधील असून गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ पुण्यात व्यवसाय करत आहेत. सुकुर हाही मुळचा पश्चिम बंगालमधील राहणार असून गेल्या १५ वर्षांपासून त्यांच्याकडे डिलिव्हरी देण्याचे काम करीत होते. शेख यांच्याकडे जामखेड तालुक्यातील खर्डा येथील अविनाश शहा यांनी सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर नोंदविली होती. हे दागिने तयार झाल्यानंतर त्यांनी सुकुर याच्याकडे १५ लाख २९ हजार ६४० रुपयांचे ७५ ग्रॅम सोन्याचे दागिने, १ लाख ६२ हजार रुपये रोख आणि दुचाकी असा १७ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज दिला होता.दागिने, पैसे व दुचाकी घेऊन सुकुर १९ नोव्हेंबरला पुण्यात निघाला. परंतु त्याने दागिन्यांची डिलिव्हरी न करता त्यांचा अपहार करुन पळून गेला. शेख यांनी त्यांचा शोध घेऊनही तो न मिळाल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत अधिक तपास करत आहेत.