विवेक भुसे।पुणे : मॅडम, मी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड डिव्हिजनचा एक्झिक्युटिव्ह असून तुमचे क्रेडिट कार्ड रजिस्टर करण्याची माझी जबाबदारी आहे़ तुमच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती द्या, असे सांगितल्यावर त्यावर विश्वास ठेवून एका प्राध्यापिकेने आपला गोपनीय क्रमांक देऊन टाकला. काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ४ लाख रुपये काढले गेले़कोणालाही आपल्या बँक खात्याचा पीन नंबर सांगू नका, असे बँका आणि पोलीस सांगत असतानाच असंख्य सुशिक्षितच या जाळ्यात अडकतात आणि आपला गोपनीय क्रमांक सांगून बसतात़ त्यानंतर त्यांच्यावर पश्चातापाशिवाय दुसरा काही पर्याय राहत नाही़ पुणे शहर पोलीस दलातील सायबर क्राईमकडे अशा प्रकारच्या दररोज अनेक तक्रारी येत असतात़ त्यात प्रामुख्याने उच्च शिक्षण घेतलेले, मध्यमवयीन पुरुष, महिला तसेच सेवानिवृत्तांची संख्या अधिक आहे़ त्या तुलनेने गरीब आणि अतिउच्च वर्गातील लोकांची संख्या अतिशय कमी आहे़. सायबर क्राईम सेलचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले, की लोक आपल्याजवळच्या लोकांना अनेक गोष्टी सांगत नाही़ पण, कोणीतरी पहिल्यांदा फोन करून काहीसांगतो आणि लोकं त्यावर चटकन विश्वास ठेवतात़. इंटरनेट हे माध्यम भुलभुलय्या आहे़ लोकांची लालच मोठी असते़ त्याचा काही जण गैरफायदा घेतात़यामध्ये प्रामुख्याने दिल्ली, झारखंड येथील तरुण लोकांना फोन करून आपल्या जाळ्यात ओढत असतात़ सायबर क्राईम सेलमार्फत १ लाख रुपयांच्या आतील फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून आरोपी निष्पन्न केले जातात व ते गुन्हे संबंधित पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले जातात़ १ लाख रुपयांच्यावरील फसवणुकीच्या गुन्ह्यांचा संपूर्ण तपास सायबर क्राईमकडून केला जातो़ प्रत्यक्ष आरोपींना त्यांच्या शहरात जाऊन पकडण्यात येते़ डेबिट, क्रेडिट कार्डचा गोपनीय क्रमांक दिल्याने फसवणूक झाल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे़ सायबर क्राईमकडे आलेल्या या तक्रारी आहेत़ शहरातील पोलीस ठाण्यांमध्येही अनेक तक्रारी येतात़ त्याशिवाय काही जणांची फसवणूक झालेली रक्कम कमी असल्याने ते तक्रार देण्यासाठीही येत नाही़ हे पाहता अशा गुन्ह्यांमध्ये खूप वाढ होत आहे़ त्यासाठी लोकांनी जागृत होण्याची आवश्यकता आहे़ सायबर क्राईममार्फत केवळ गुन्हेगारांना पकडले जाते असे नाही तर त्यांची गेलेली रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो़ पण, त्यासाठी तक्रारदाराने तातडीने सायबर क्राईमशी संपर्क साधणे आवश्यक असते़१०० रुपयांसाठी गमावले १६ हजार रुपयेएका तरुणीने मॉलमधून ४०० रुपयांचा शर्ट खरेदी केला होता़ प्रत्यक्षात तिच्याकडून ५०० रुपये दिले गेले़ तेव्हा तिने कंपनीच्या कस्टमर केअर नंबरवर फोन केला़ तेथील प्रतिनिधीने तिला १०० रुपये रिफंड करतो, म्हणून सांगितले़ त्यावर विश्वास ठेवून तिने आपला पिन नंबर त्याला सांगितला़ त्यानंतर तिच्या खात्यातून १६ हजार रुपये काढले गेले़पुण्यातील एका महाविद्यालयाच्या प्राचार्याने अशाच प्रकारे आपला ओटीपी क्रमांक दिला व त्यांच्या बँक खात्यातील ५४ हजार रुपये ट्रान्स्फर झाले़ पण, त्यांनी तक्रार करेपर्यंत झारखंडमधील त्या मर्चंटमधून ५० हजार रुपये काढले गेले होते़ त्यांना फक्त ४ हजार रुपये परत करता आले़ सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांकडून अशीच गोपनीय माहिती दिली गेली़ त्यामुळे त्यांच्या खात्यातून ९६ हजार रुपये काढले गेले़ हे पैसे झारखंडमधील एका पेटीएममध्ये ट्रान्स्फर झाले होते़ त्यापैकी ६० हजार रुपये रिफंड होऊ शकले़काय काळजी घ्यालकार्ड आणि पिन नंबर एकत्र ठेवू नयेअसुरक्षित नेट कॅफेमधून बँक व्यवहार करू नकातुमचा पासवर्ड अथवा पिन मागणाऱ्या ई मेलला प्रतिसाद देऊ नकापिन नंबर कोठेही लिहून ठेवू नका, तो नेहमी लक्षात ठेवाइंटरनेट बँकिंग व्यवहार झाल्यावर ब्राऊझर बंद करून लॉग आॅफ कराकार्ड हरविल्यास तातडीने तक्रार द्या
पिन क्रमांक देऊन फसताहेत सुशिक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 7:14 AM